तृतीय पंथिया कडून तरुणाचे अपहरण, लिंग परिवर्तन साडी नेसून मागायला लावली भीक

अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल
मुंबईं /क्राईम रिपोर्टर
तृतीय पंथियांच्या टोळी कडून 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचे लिंग परिवर्तन करून त्याला साडी घालून भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांचे इतक्यावरच समाधान झाले नाही तर त्यांनी त्याचे अश्लील व्हिडिओ काढत त्याच्या आई कडून खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेणाऱ्या तरुणाने केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड मधील कुरार गावातील अप्पापाडा येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय किशोरने पोलिसांना सांगितले की, त्याची सुमारे दीड वर्षांपूर्वी कावेरी (कार्तिक वेदमणी निकम) तिच्याशी मैत्री झाली. या ओळखीतून त्याची भेट नेहा खान ( नेहा इप्टे ) तिच्याशी झाली. नेहा ही मालवणीतील एका ट्रान्सजेंडर गटाची प्रमुख होती.
५ ऑगस्ट रोजी किशोरला नेहाच्या घरी बोलावण्यात आले होते. जिथे नेहा, कावेरी, भास्कर शेट्टी आणि माही यांनी त्याला लिंग परिवर्तनासाठी जबरदस्ती केली. जेव्हा पीडित तरुणाने लिंग परिवर्तनासाठी नकार दिला तेव्हा त्यांनी त्याला एका खोलीत बंद केले, त्याला मारहाण केली आणि अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. त्यानंतर व्हिडिओचा वापर पैशाची मागणी करण्यासाठी करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीपोटी पीडित मुलीच्या आईने दहा हजार रुपये ट्रान्सफर केले.
त्यानंतर पुढील काही दिवसात या टोळीने अधिक पैशांची मागणी केली आणि सार्वजनिकरित्या त्याचा अपमान केला. शिवाय त्याला साडी नेसवून भीक मागायला देखील लावली. यानंतर २८ ऑक्टोबर रोजी नेहा, तिचा पती सोहेल खान, त्यांचा दत्तक मुलगा भास्कर आणि इतरांनी त्याला सुरतमधील रिपल मॉलजवळील रुग्णालयात नेले. तिथे त्याला कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईत परतल्यानंतर, नेहाने त्याच्या शस्त्रक्रियेच्या ठिकाणी गरम पाणी ओतले आणि त्याला घरकाम करायला भाग पाडले असा दावा त्याने केला आहे. त्याला सोडण्यासाठी तिने साडेचार लाख रुपयांची मागणी केली.
४ नोव्हेंबर रोजी किशोरने त्यांच्या तावडीतून पळ काढला. मात्र तो पुन्हा पकडला गेला. सुदैवाने आजूबाजूला असलेल्या स्थानिक रहिवाशांच्या हस्तक्षेपामुळे त्याची टोळीच्या तावडीतून सोडण्यात आले. त्यांनतर या पीडित मुलाने पोलीस ठाणे गाठत संबंधित टोळीबद्दल तक्रार दाखल केली. या विद्यार्थ्याने तक्रारीत त्याच्यावर झालेल्या लैंगिक शोषण या ट्रान्स जेंडर टोळीने केल्याचा आरोप केला.
पीडित तरुणाच्या तक्रारीच्या आधारे, आरोपींवर कट रचणे, अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि जबरदस्तीने लिंग परिवर्तन करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून या चौघांची चौकशी सुरू आहे. या घटनेने मुलांच्या सुरक्षेवरील प्रश्न ऐरणीवर आला आहे.




