टोरेस ते घातला हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
![](https://navprahar.in/wp-content/uploads/2025/01/IMG_20250107_180747-780x470.jpg)
मुंबई / विशेष प्रतिनिधी
हिंदीत एक म्हण आहे ‘ जब तक बेवकुफ जिंदा है, अकलमंद भुके नही मरते ‘ याची प्रचिती अनेकदा येते. जास्त व्याजाचे किंवा परताव्याचा लोभ देऊन काही संधीसाधू लोक जनतेकडून पैसा गोळा करतात आणि काही वेळेनंतर ते रक्कम घेऊन पसार होतात. मग गुंतवणूकदारांकडे हालमळत बसण्यापेक्षा पर्याय नसतो. गुंतवणुकीवर १०℅ परतवा देण्याचे लालच देऊन एक कंपनी लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाली आहे. दादर परिसरात हा प्रकार घडला आहे.
दादर येथील टोरेस कंपनीच्या शो रुमबाहेर शेकडो गुंतवणूकदार जमा झाल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आता याप्रकरणाबाबत एका भाजीपाला विक्रेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर टोरेस कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. पण ज्या भाजीपाला विक्रेत्याने तक्रार दिली आहे त्याने या कंपनीत तब्बल ४ कोटींहून अधिक रुपये गुंतवल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
भाजी विक्रेता प्रदीपकुमार मामराज वैश्य (३१) यानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. यात प्रदीपकुमार यानं कंपनीनं गुंतवणूकदारांना कसं लुबाडलं याची संपूर्ण कहाणी सांगितली. कंपनीकडून सुरुवातीला गुंतवणूकदारांना दरआठवड्याला ७ टक्के व्याज दिलं होतं. सोबत गुंतवणूक केलेल्या रकमेच्या मोबदल्यात त्यांना एक डायमंड देखील दिला जात होता. ज्याला बाजारात किंमत नव्हती पण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तो खडा दिला गेला होता. दरआठवड्याला कंपनीकडून गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसेही जमा होत होते. कंपनीच्या अॅपवरही सर्व माहिती गुंतवणूकदारांना उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून कोणताच हप्ता खात्यात जमा झाला नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
भाजीपाला विक्रेत्याने इतके पैसे गुंतवले कसे?
प्रदीपकुमार वैश्य याचं दादरच्या टोरेस शोरुम समोरच भाजीपाल्याचं दुकान आहे. त्यानं या कंपनीत ४ कोटी रुपये गुंतवले होते. इतके पैसे कुठून आले आणि ते का गुंतवले याची संपूर्ण माहिती त्यानं सांगितली.
“टोरेस नावाचं शोरुम गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालं होतं. शोरुमच्या समोरच माझं भाजीपाला विक्रीचं दुकान आहे. शोरुमबाहेर नेहमी गर्दी असायची. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण नंतर माहिती काढली तर कळालं की तिथं पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत होतं. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा एका ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवल्यानंतर त्याला कसा दरआठवड्याला परतावा दिला जात आहे ते दाखवलं. सहा ते सात आठवडे त्यांना पैसे मिळाले होते. त्यामुळेही मीही विश्वास ठेवला आणि सुरुवातीला ६ लाख ७० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर दोन-तीन महिने मला परतावा वेळेत मिळत होता. मग कंपनीनं परतावा देण्याची टक्केवारी वाढवली. माझा विश्वास आणखी वाढला आणि माझी पत्नी, कुटुंबीय यांच्यासह मित्र परिवारासह अनेकांना याची माहिती दिली. त्यांच्याकडून पैसे घेतले, घर गहाण ठेवून पैसे घेतले असं करत करत मी एकूण ४ कोटी २७ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. हे तर मी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनने दिलेली आकडेवारी आहे जी मी एफआयआरमध्ये नमूद केली आहे. पण काही व्यवहार मी रोकडमध्येही केले आहेत. माझ्याशिवाय असे आणखी काही लोक आहेत की ज्यांनी ५ ते ७ कोटी रुपये कुणाकुणाकडून घेऊन गुंतवले आहेत. ते बिचारे इथे येऊ देखील शकलेले नाहीत”, असं भाजीपाला विक्रेता प्रदीपकुमार वैश्य यानं सांगितलं.
संचालकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
टोरेस कंपनीच्या संचालकांनी २१ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान गुतंवणूकदारांची फसवणूक केली. या कालावधीत प्लॅटिनम हर्न प्रा.लि. ही कंपनी आणि कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटीना कुमार यांनी मोजोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले. त्याला बळी पडून गुंतवणूकगारांनी १३ कोटी ४८ लाख १५ हजार रुपये गुंतवले असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.