अन त्याला वाचवण्यासाठी तिने झाडावर काढले 738 दिवस
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
जगात वृक्षप्रेमी , पशुप्रेमी यांच्या संस्था आहेत. ते वृक्ष आणि पशूंना वाचवण्यासाठी आंदोलन देखील करतात.भारतातलं चिपको आंदोलन जगभरात एक उदाहरण ठरलं; पण एखादी व्यक्ती झाडाला किती दिवस बिलगून राहून शकते?
एका महिलेने वृक्षतोड रोखण्यासाठी झाडावर राहण्याचा निर्णय घेतला. ज्यूलिया बटरफ्लाय हिल नावाची महिला सुमारे 26 वर्षांपूर्वी 200 फूट उंच झाड वाचवण्यासाठी त्यावर राहू लागली. तिने या झाडावर 738 दिवस वास्तव्य केलं.
ज्यूलियाने हा प्रकार कोणत्याही योजनेनुसार किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी स्टंट म्हणून केला नाही. ही गोष्ट घडण्यामागे एक मनोरंजक कथा आहे. ज्यूलिया बटरफ्लाय हिल ही पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे. पर्यावरणासाठी काही तरी करण्याची संधी तिला डिसेंबर 1997मध्ये मिळाली. त्या वेळी 23 वर्षांची ज्यूलिया कॅलिफोर्नियातल्या रस्त्यावरून प्रवास करत होती. त्या वेळी तिची ओळख हम्बोल्ट काउंटीतल्या रेडवुडजवळच्या ट्री सिट्सच्या माध्यमातून भ्रमंती करणाऱ्या पर्यावरणवादी लढवय्यांच्या एका गटाशी झाली.
एका घटनेतून मिळाली प्रेरणा
वयाच्या विसाव्या वर्षी एका गंभीर कार अपघातानंतर ज्यूलियाला तिच्या जीवनाचं संतुलन बिघडल्याची जाणीव झाली. तिने सांगितलं, की या अपघाताने मला त्या क्षणाचं महत्त्व जाणवलं आणि भविष्यावर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी मी काही करू शकते, यासाठी प्रेरणा दिली.
झाडावर विसावला विरोध
1997मध्ये पुरातन वृक्षांची तोड ही मोठी समस्या निर्माण झाली होती. कारण संपूर्ण अमेरिकेत रेडवुड इकोसिस्टीम केवळ तीन टक्के बाकी राहिली होती. पॅसिफिक लंबर कंपनी एक वृक्ष तोडण्याची शक्यता होती. हा वृक्ष एक हजार वर्षं जुना होता. या झाडावर वीज कोसळूनदेखील तो जिवंत आणि सुस्थितीत होता. आंदोलकांनी चंद्राच्या नावावरून त्याचं नाव लुना असं ठेवलं.
हे करण्याचं पूर्वनियोजित नव्हतं
वृक्षतोडीला काही दिवस विरोध करणं हा आंदोलकांचा उद्देश होता. एखादी व्यक्ती एक आठवडा या झाडावर राहावी, असं आयोजकांना वाटत होतं. कोणी स्वेच्छेने हे काम करण्यास तयार नसल्याने त्यांना माझी निवड करावी लागली, असं ज्यूलियाने सांगितलं. तोपर्यंत ज्यूलिया अधिकृतपणे कोणत्याही पर्यावरण संघटनेशी संबंधित नव्हती. तिने स्वतः सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला.
एका लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर
सुरुवातीला हिलला सहा बाय चार फुटांच्या लाकडी प्लॅटफॉर्मवर राहण्याची संधी दिली गेली. लुना वृक्षावर राहत असताना तिला सौर ऊर्जेवर चालणारा एक फोन देण्यात आला. माध्यमांना तिला तिचा प्रवास सांगता यावा हा त्यामागचा उद्देश होता. तिला जेवणासह इतर वस्तू देण्यासाठी स्वयंसेवक रोज टेकडीवरच्या वृक्षाकडे तीन मैल चढून जात.
प्रकरण ताणलं गेलं
हिलला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्रास दिला गेला. लाकूडतोड्यांनी तिला धमक्या दिल्या. तसंच तिला सर्व ऋतूंत झाडावरच राहावं लागलं. लवकरच तिला इतर संघटनांसह अर्थ फर्स्ट आणि स्वयंसेवकांचा सक्रिया पाठिंबा मिळू लागला आणि हिलला होणारा विरोध आणि आंदोलन ताणलं गेलं.
अडचणींनी भरलेला होता काळ
हे आंदोलन हिलसाठी सोपं नव्हतं. त्या वेळी वादळ कॅलिफोर्नियाला धडकलं. जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक दिवस ज्यूलियाला थंडीशी सामना करावा लागला. तसंच ओलं राहावं लागलं. तिने ‘ट्रीसिस्टर्स’ला सांगितलं, की ‘गैरसोय आणि भीतीमुळे मी लहान मुलासारखी रडत होते.’ जेवण बनवण्यासाठी तिच्याकडे एक सिंगल बर्नर प्रोपेन स्टोव्ह होता. ती स्लीप बॅगमध्ये झोपत होती.
शेवटी समझोता झाला
दीर्घ काळ चाललेल्या चर्चेनंतर लुना झाडावरून खाली उतरण्यास ज्यूलिया तयार झाली. या वृक्षाचं कायमस्वरूपी संरक्षण केलं जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. यामुळे अमेरिकेत वृक्षांच्या कमतरतेबाबत जागृती झाली. जेव्हा ज्यूलिया झाडावरून खाली उतरली तेव्हा ती नॅशनल हिरो बनली होती. तेव्हापासून ती एक प्रेरक वक्ता, बेस्टसेलर लेखिका आणि सर्कल ऑफ लाइफ फाउंडेशन तसंच ना नफा-ना तोटा नेटवर्कची सह-संस्थापक बनली. ती जगभरात पर्यावरण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आघाडीवर राहिली आहे.