पाण्यासाठी दाहीदिशा… पाणी ओढून मिटताहेत हातावरील रेषा
बोरखेडी, बांबर्डा गावातील विहिरींना कोरड
– शेतशिवारातील विहिरींवर पाण्यासाठी पायपीट
– विहिरीतून पाणी ओढताना पिढ्यांच्या हातावरील रेषा धुसर
– परिसरातील सात ते आठ गावांत पाणीटंचाई
– ‘हर घर नल पण, नळात नाही जल’
वर्धा / आशिष इझनकर
जिल्ह्यातील आष्टी शहिद तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात गेल्या पन्नास वर्षापासून गाव तलावाची मागणी पूर्ण झाली नाहीए. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या या गावात पाणीटंचाई भीषण आहेय. सकाळी सहा ते सात वाजताच गावातील महिला, पुरुष, चिमुकल्यांची पावले गावाबाहेर असलेल्या विहिरी पाणी भारतात. गावात योजना असली तरी नळ पाण्याअभावी कोरडेच आहेय. विहिरीतील पाणी ओढून दोरखंडाने पिढ्यांच्या हाताच्या रेषा धुसर होत आहेत. पण, पाण्याची समस्या मात्र मिटलेली नाही.
आष्टी तालुक्यातील बोरखेडी, बांबर्डा गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन. माळरान भागात वसलेल्या गाव परिसरात अनेक दशकांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. तसे तर जानेवारी महिन्यापासूनच येथील विहिरींची पाणी पातळी खालावते. एप्रिल, मे महिन्यासोबत पाऊस येईस्तोवर परिस्थिती अधिकच बिकट असते. पाण्यासाठी गावालगतच्या विहिरीवर जावे लागते. ज्यांच्याकडे बैलगाडी आहे ते ड्रमने दुर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीतून पाणी आणतात. एखादवेळी टँकर बोलाविला जातो. महिला, पुरुष, चिमुकल्यांचीही पाण्यासाठी पायपीट होते. बरेचदा रात्रीही टॉर्च लावून पाण्याकरिता जावे लागत असल्याचे अनुभव गावकरी सांगतात.
गावात पाणी पुरवठा योजना आहे. येथे माळेगाव येथील तलावातून पाणी पुरवठा होतो. पण, तलावातील पाणीही अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे घरोघरी नळ दिसत असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी वास्तविकता मात्र वेगळीच दिसते. जिथे माणसाला पाण्यासाठी पायपीट करावी लागते तेथे जनावरांनाही पाणीटंचाईचा फटका बसतोय. अनेक पशुपालक जनावरांसह उन्हाळ्याच्या कालावधीत इतरत्र स्थलांतर करत असल्याचे सांगण्यात येते. गावात पाण्याची समस्या असल्याने पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचा परिणाम लग्नावर होत असल्याचे नागरिक सांगतात. पाण्यासाठी कष्ट करावे लागत असल्याने येथे सोयरिक करण्यासाठी पाणीटंचाई अडसर ठरत असल्याचे सांगितले जाते. येथीलच महादेव तायवाडे या गृहस्थाने गेल्या साठ वर्षापासून गावात तलाव व्हावा यासाठी पाठपुरावा केलाय.
गावासाठी तलाव हाच पार्याय योग्य आहेय, तलाव झाला तर परिसरातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा, किन्ही, मुबारकपूर, मोई अशा अनेक गावाचा पाणी प्रश्न मिटेल आणि तहानलेल्या गावाला पाणी मिळेल.
गावात पाणी नाही, सतत जानेवारी पासून तर जुलै महिन्यांपर्यत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे गावात मुलांना मुलगी देण्यास मुलीचा बापही धजावत आहे. गावात सुमारे 35 मुलांचे विवाह अजून झाले नाही. गेल्या दोन वर्षात केवळ एक विवाह गावात झाल्याचे गावकरी सांगतात. चंद्रशेखर तायवाडे, गणेश लोमटे, दिवाकर वाढवे, प्रफुल ठाकरे, संदीप घाटी, पंकज मरापे, चित्रा तायवाडे, सुलोचना चेले या विहिरीवर पाणी भरणाऱ्या नागरिकांनी तर शासन आणि प्रशासन सतत गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे.
आष्टी शहीद तालुक्यातील बोरखेडी बांबरडा या गावात पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आर ओ वॉटर प्रोजेक्ट उभारण्यात आला. पण निळ्या टिनाच्या आत उभारण्यात आलेल्या या प्रोजेक्ट मधून बोरखेडी गावातील नागरिकांना एकही दिवस शुद्ध पाणी मिळाले नाही. कित्येक वर्षे झालीत या गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. साधे पाणी मिळत नाही तेथे शुद्ध पाणी कुठून मिळणार? लाखो रुपयांचा खर्च या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रोजेक्ट वर करण्यात आला. पण अजूनही घशाला कोरड कायम आहे.
जलजीवन मिशन योजनेत गाव आहे, बांबरडा ग्राम पंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजना आखली गेली. जिल्हा परिषद वर पदाधिकारी नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी कारभार पाहतात. या भागातील अनेक गावांत योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. योजनेच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेत दोष आढळून येत असल्याची ओरड आहे.