राजकिय

महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे “राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री!

Spread the love

मुंबई / उदय नरे

राजकीय विश्लेषक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली आणि राज्यातील राजकारण ढवळून गेले आहे. या भेटीमध्ये केवळ राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता या गुप्त बैठकीत उपस्थित नव्हता त्यामुळे बंद दरवाजा आड कोणती चर्चा झाली याचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. अमित शहा व राज ठाकरे यांची जी भेट होती ही यापूर्वीच ठरली होती आणि या भेटीपूर्वी महाराष्ट्रातील एक राजकीय नेते आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षात असलेले नेते विनोद तावडे यांची भेट झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सहभागाबद्दल संघाकडून मान्यता असल्याचे सांगितले जाते. हिंदुत्वाचा मुद्दयावर राज ठाकरे यांची भूमिका व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे राज्यातील एक नेता आमच्या बरोबर येत आहे तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंचा करिश्मा महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ९ मार्च २००६ ला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष बाळासाहेबांच्या हयातीतच राज ठाकरे यांनी स्थापन केला. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेना नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, व इतर शिवसैनिकही बाहेर पडले होते. शिवसेनेसह बाळासाहेब ठाकरे यांना हा फार मोठा धक्का होता. बाळासाहेब ठाकरेंकडून म्हणजेच आपल्या काकांकडून राज ठाकरेंना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या घरातच मिळालं. व्यंगचित्रकला आणि राजकारण या दोहोंबाबत राज ठाकरेंचे गुरु बाळासाहेबच होते. राज ठाकरेंनी जेव्हा स्वतःचा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी मराठीचा व हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात वापरला होता

नव्या पक्षाचे इंजिन जोरदार धावले

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपली व आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली. मनसेचे १३ आमदार त्या निवडणुकीत जिंकून आले होते. मराठीचा मुद्दा, मराठी पाट्या, पोलिसांसाठी केलेलं आंदोलन यामुळे राज ठाकरे हे कायमच जनतेच्या मनात चर्चेत राहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी थेट मोदींना पाठिंबा दिला. आणि दिलेली चपराक शिवसेना पक्षाला जोरदारपणे बसली होती. राज ठाकरेंना २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये खूप भरघोस यश मिळालं नाही.शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष रस्त्यावर आला. एकमेकांवर प्रहार करण्यात आले निवडणुकांमध्ये त्यांचा एक-एकच आमदार निवडून आला. २०१९ मध्ये त्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ अशी घोषणा करुन विरोधकांची गोची करून टाकली होती. यांची बरीच चर्चा झाली होती. महाविकास आघाडीचं सरकार आले. अल्पावधीतच राज्यात करोनाचं संकट आल्यानंतर दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये गेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजेच राज ठाकरेंचे बंधू आणि होते पण उद्धव ठाकरेंची धोरणं राज ठाकरेंना पटली नाहीत हे त्यांच्या कृतींमधून, पत्रांमधून, वक्तव्यांतून दिसून आलं.

राज ठाकरे यांच्या जवळ भारतीय जनता पक्ष कशासाठी गेला.
मुंबईत उद्धव ठाकरेंना शह देण्याची ताकद राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाची ताकद काय होती व काय आहे? याचा अंदाज भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांनी केला.

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत राज यांनी शिवसेनेला शह दिला होता. मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले होते. तर शिवसेनेला केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. २०१२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे २८ उमेदवार विजयी झाले. हा काळ मनसेसाठी उत्कर्षाचा होता. पण २०१४ नंतर राज यांच्या पक्षाची पिछेहाट होत गेली. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला प्रत्येकी एका जागेवर यश मिळालं. सध्याच्या घडीला मुंबईत मनसेचा एकही आमदार नाही. आता लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात शह देण्याची संधी राज यांच्याकडे आहे .मनसेचे काही नेते आज भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी राज ठाकरे यांना जवळ करणे गरजेचे आहे. नाशिक व पुणे येथे सुध्दा महाराष्ट्र नव निर्माण सेनेची चांगल्या प्रकारे ताकद आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील ठिकाणी मनसे निवडणूक जिंकून येण्याची शक्यता नसली तरी मनसेच्या सहकाऱ्यांने निवडणूकीत बाजी मारण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे इंजिन महायुतीमध्ये जोडल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना शह देण्यासाठी “राज “मार्ग स्वीकारला आहे.

राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भेट ही महाराष्ट्रातील राजकारणाची नव्या पर्वाची सुरुवात असेल का? भाजपा-मनसे एकत्र येणार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार? हे काळच ठरवेल!

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close