जॉबकार्ड वर सही करण्याकरिता 10 हजाराची लाच स्वीकारताना सरपंचाला रंगेहात अटक,
यवतमाळ ACB ची कारवाई…
यवतमाळ / अरविंद वानखडे
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत.! वैयक्तिक सिंचन विहिरीच्या कामाच्या मजुरांच्या जॉबकार्डवर सही करण्याकरिता 10 हजार रुपयाची लाच घेताना; उमरखेड तालुक्यातील कोपरा खुर्द (कृष्णापुर) येथील सरपंच सुनील शंकर वाघमारे (वय ३८) यांना लाचलुपत विभागाने ढाणकी उमरखेड रोडवरील रविचंद्र गादिया लेआउट’च्या मोकळ्या जागेत सापळा रचून अटक केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रार कर्त्याच्या आईचे नावे मंजूर झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामगार लावून, केलेल्या कामांच्या मजुरांच्या जॉब कार्ड वर सही करणे करिता कोपरा खुर्द (कृष्णापुर ) येथील सरपंच सुनीलकुमार शंकर वाघमारे यांनी १० हजार रुपयाची मागणी केली. अशी तक्रार १७ जुलै रोजी तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे दिली. त्यानुसार १९ जुलै रोजी केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान पंचासमक्ष आरोपी सुनीलकुमार वाघमारे सरपंच यांनी तक्रारदार यांना स्वतः करिता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून, लाच रक्कम स्वीकारली. यावेळी सापळा रचून बसलेल्या प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रकमेसह सरपंच वाघमारे यास ताब्यात घेतले व त्याचे विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप – अमरावती, देविदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक – अमरावती, उत्तम नामवाडे पोलीस उप अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, अमित वानखेडे यांनी पार पाडली. तर या घटनेमुळे शासनाच्या योजनेपासून लोकप्रतिनिधी सुद्धा पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही या बाबीला दुजोरा मिळाला असून, यामुळे पैसे घेणाऱ्या लोकप्रतिनिधी मध्ये खळबळ उडाली आहे.