क्राइम

तीन शाळकरी मुलींनी रचला आपल्याच अपहरणाचा बनाव 

Spread the love

उमरगा / विशेष प्रतिनिधी

                     उमरगा ठाण्यात ड्युटीवर असलेले सगळे कर्मचारी आपआपल्या कामात व्यस्त असताना अचानक ठाण्यातील फोन खणखणतो. इकडून हॅलो म्हणताच पलीकडून आवंठा गिळत अत्यंत घाबरलेल्या आवाजात पलीकडून पोलिसांना सांगण्यात येते की, साहेब माझ्या मुलीसोबत आणखी दोन ( ऐकून तीन ) मुलींचे अपहरण झाले आहे. असे सांगितल्या जाते. घटनेचे गांभीर्य ऐकून फोन घेणारा शिपाई लगेच ठाणेदारांना याची माहिती देतो. ठाणेदार देखील लगेच सूत्रे हलवतात. दोन टीम तयार करून मुलींच्या शोधासाठी रवाना करतात. मुलींपैकी एकीचा नंबर घेऊन तो सर्व्हिलान्स वर टाकतात. आणि अवघ्या 30 मिनिटात मुलींचा शोध लावतात.

त्या कुठे आहेत हे समजल्यानंतर त्यांनी ताब्यात घेतले जाते. पण त्यानंतर जे सत्य समोर येतं त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. तर पोलिसही अशा केसने अचंबित झाले आहेत. सर्वांनाच चक्रावून टाकणारी ही घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथं घडली आहे.

उमरगा तालुक्यात तुतोरी हे गाव आहे. या गावात ज्ञानेश्वर विद्यालय आहे. या विद्यालयात शिकणाऱ्या तिन मुलींचे अपहरण झाले आहे. त्यांच्या मानेवर चाकू ठेवून त्यांना एका पिवळ्या रंगाच्या गाडीतुन नेण्यात आले आहे. त्यांना वाचवा अशी मदत मागणारा फोन उमरगा पोलिसांना आला होता. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती तुम्हाला कुणी दिली अशी विचारणा केलीय. त्यावर आपल्या मुलीनेच फोन करून हे सांगितलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्या मुलीचे मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आले. ते मोहोळ इथं दाखवले गेले. त्या पुणे बसमध्ये असल्याचं पोलिसांनी समजलं. तिथेच त्यांना अडवण्यात आलं. नंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं.

हा प्रकार इथेच थांबत नाही. इथून खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रकरणावरून पडदा उठतो. त्या मुलींकडे अपहरणाबाबत पोलिस विचारपूस करतात. त्यावेळी त्यांच्या समोर धक्कादाय खुलासा या तिन अल्पवयीन मुली करतात. या तिन ही मुली BTS-V ह्या कोरियन सिंगर आणि डान्स ग्रुपच्या चाहत्या होत्या. काही करून त्यांना या सिंगरची भेट घ्यायची होती. त्यासाठी या तिघींनी कोरियाला जाण्याचा प्लॅन केला होता. पण जायचं कसं असा त्यांच्या पुढे प्रश्न होता. अशा वेळी या तिघींनी मिळून एक प्लॅन केला. हा प्लॅन खतरनाक होता.

हा प्लॅन त्यांनी स्वत:च्याच अपहरणाचा रचला होता. त्या आधी या तिघींनी घरातून पैसे चोरी केले. पाच हजार रूपयांची त्यांनी चोरी केली. उमरगा ते पुणे जायचे असं ठरवलं. पुढे पुण्यात जाऊन पैसे कमवायचे. त्यानंतर तिथून दक्षिण कोरियाला जायचं. तिथे त्या सिंगर ग्रुपला भेटायचे असा प्लॅन केला होता. त्यानुसार त्यांनी बस पकडली. त्या आधी आपले अपहरण झाले आहे असं घरच्यांना कळवलं. तिथून त्या पुण्याच्या दिशेने निघाल्या. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना अवध्या अर्धा तासाच्या आता परत त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं.

या तिनही मुली उमरगा तालुक्यातील निलुनगर तांड्यावर राहणाऱ्या आहेत. उमरगा पोलीसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या 30 मिनिटाच्या आत या 3 अल्पयीन मुलीच्या अपहरणाचा बनाव उघड केला. त्यांच्या या कृती मुळे या मुलींचे पालक हादरून गेले आहेत. मुलींनी कट रचला. घरातून पळ काढला. अपहरणाचा बनाव ही केला. त्या आधी घरी चोरी केली. ऐवढ्या लहान वयात मुलींनी हे काय केलं यामुळे पालक आवाक झाले आहेत. तर पोलिसही चक्रावून गेले आहेत. या अपहरणाच्या बनावाची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close