सामाजिक

टोल प्लाझावर टोल न देताच हजारो वाहने निघाली हे आहे त्या मागील कारण 

Spread the love

आग्रा /प्रतिनिधी

                आग्रा लखनौ एक्सप्रेस वे वर दिवाळीच्या रात्री अजब प्रकार पहायला मिळाला. येथे वाहने टोल साठी न थांबता तशीच निघून जात होती. टोल गेट फ्री असल्याने वाहन धारक देखील आश्चर्य व्यक्त करीत होते. यामागील कारण मात्र वेगळेच होते. टोल मालकाने कर्मचाऱ्यांना फक्त ११०० रु.बोनस दिल्याने टोल कर्मचारी नाराज झाले आणि त्यांनी टोल ओपन करून संताप व्यक्त केला. यात वाहनधारकांचा मात्र फायदाच झाला.

दोन तासांत हजारो गाड्या टोल न देताच गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. टोल कंत्राटदार कंपनीने या कर्मचाऱ्यांना केवळ ११०० रुपये दिवाळी बोनस दिल्याने या कर्मचाऱ्यांनी नाराज होऊन काम बंद आंदोलन सुरु केले. यामुळे हा प्रकार घडल्याचे नंतर समोर आले.

फतेहाबाद टोल प्लाझाचे कामकाज ‘श्री साइन अँड दातार कंपनी’कडे आहे. दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी केवळ ११०० रुपयांच्या ‘बोनस’ची घोषणा केली. वर्षभर कठोर परिश्रम करूनही इतका कमी बोनस मिळणे अपमानजनक आहे, अशी कर्मचाऱ्यांची भावना होती.कंपनीने मार्च २०२५ मध्ये कंत्राट घेतले असले तरी ते वर्षभर याच टोलवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ण वर्षाचा बोनस मिळायला हवा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती.

नाराज कर्मचाऱ्यांनी सकाळच्या शिफ्टमध्ये येताच कामावर बहिष्कार टाकला आणि टोल गेट पूर्णपणे उघडे सोडले. काही मिनिटांतच टोलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि कार, बस तसेच ट्रक्सही न टोल देता पुढे जाऊ लागले. सुमारे दोन तास ही स्थिती कायम होती आणि अंदाजे दहा हजारांहून अधिक वाहने टोल फ्री निघाली. यामुळे कंपनीला लाखो रुपयांचे नुकसान झाले.

पोलिसांचा हस्तक्षेप आणि अखेरचा तोडगा
टोलवर गोंधळ झाल्याची माहिती मिळताच फतेहाबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात मध्यस्थी करत चर्चा सुरू केली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीनंतर, कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात त्वरित १० टक्क्यांची वाढ केली जाईल, बोनस वाटप करताना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल अशी आश्वासने दिली.

या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि सुमारे दोन तासांनंतर टोल प्लाझाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल यूपी एक्स्प्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणकडे पाठवला असून, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कंपनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close