थोरल्या भावाने मित्राकर्वी धाकट्याचा केला निर्घृण खून.
सावरी ते खेडेपार रस्त्यावरील घटना
धारदार शास्त्राने केले सपासप वार
२ आरोपींना अटक
भंडारा/ लाखनी / चंद्रकांत श्रीकोंडवार
क्षुल्लक आपसी वादातून सख्ख्या थोरल्या भावाने मित्राच्या मदतीने धाकट्या भावाच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या सहाय्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी(ता.१३) रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव आकाश रामचंद्र भोयर(३१) रा. सावरी/मुरमाडी, ता. लाखनी असे आहे. तर आरोपींची नावे राहुल रामचंद्र भोयर(३३) रा. सावरी, तालुका लाखनी, शुभम मारोती न्यायमूर्ती रा. नागपूर अशी आहेत. १५ तासांत खूनाचा छडा लावून आरोपींना अटक केल्याने लाखनी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार तपास करीत आहेत.
मृतक आकाश भोयर हा एका शुद्ध पाणी वाटप करणाऱ्या केंद्रावर मजुरीचे काम करीत होता. तो अविवाहित असून आई व भावासह वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री १०:४५ वाजता दरम्यान पोलीस ठाणे लाखनी येथे गावातील एका इसमाने भ्रमणध्वनी द्वारे सूचना करून खेडेपार रोड वरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असून सोबत एक चपलेचा जोड आहे. अशी माहिती दिल्याने लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलीस हवालदार संजय अरकासे, पोलीस शिपाई राजेश पटले, पंकज निरगुळे घटना स्थळी पोहचले व परिसराची पाहणी केली असता ५० फुट अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह पडलेला दिसून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याच्या जखमा दिसून आल्या. घटना स्थळावर गेलेल्या पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह, श्वान पथक व ठसे तज्ञांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाची विलंब न लावता उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार घटनास्थळी पोहचले. घटनास्थळ पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस पाटील ऋषी दिघोरे यांनी मृतदेह उत्तरीय परीक्षणाकरिता ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पाठविला. मृतक सावरी येथील रहिवासी असल्याची चर्चा पोलिसांच्या कानावर गेल्यामुळे त्याचे कुटुंबीयास ओळख पटविण्यासाठी बोलवण्यात आले. हा रक्तरंजित मृतदेह मुलाचाच असल्याने आईने हंबरडा फोडला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ राहुल भोयर यास ताब्यात घेवून विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मित्रांच्या मदतीने आपणच खून केल्याची कबुली दिल्याने आरोपीस पकडण्यासाठी पोलिस पथक नागपुर ला पाठविण्यात आले. मंगळवारी(ता.१४) दुपारी ३:३० वाजताचे सुमारास मुख्य आरोपी मारोती न्यायमूर्ती याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार तपास करीत असून वृत्त लिही पर्यंत गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पोलिसांना मिळाले नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
*अशी घटना आली उघडकीस*(चौकट)
मंगेश टिचकुले हा मित्रासह दुचाकीने गोंडसावरी येथे रात्रकालीन प्रौढ कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात खेडेपार रस्त्यावरील गुनिराम वंजारी यांचे शेताजवळ डांबरी रस्त्याच्या कडेला अधिक प्रमाणात रक्त सांडलेले व चपलेचा जोड दिसून आल्याने पोलिसांना माहिती दिली त्यामुळे घटनेचा उलगडा झाला.
*वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर(चौकट)*
सावरी/मुरमाडी शेतशिवारात खून झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवाने यांनी घटनास्थळाला भेट देवून तपासाबाबत लाखनी पोलिसांना सूचना केल्या.
*असा लागला संशयिताचा सुगावा(चौकट)*
मृतदेह सावरी/मुरमाडी येथील युवकाचा असल्याची माहिती होताच ओळख पटविण्यासाठी त्याची आई व मोठ्या भावास बोलविण्यात आले. मृतदेहाची ओळख पटली पण भावाच्या जुत्यावर रक्ताचे ताजे डाग असल्याचे पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. त्याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच मित्राच्या साहाय्याने खून केल्याची कबुली दिली.