त्या बेपत्ता बालकांचे मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ
नागपूर / विशेष प्रतिनिधी
फारुखनगर मधून बेपत्ता झालेल्या तीन बालकांचे मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ माजली आहे. येथील 2 मुली आणि एक मुलगा शनिवारी दुपार पासून बेपत्ता होते. अनेक ठिकानी शोध घेतल्यानंतर ते सापडून न आल्याने पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांनी कळविले होते. पोलिसांनी सोशल मीडिया सह स्वान पथकाचा सहाय्य घेतले. स्वान एका कारजवळ जाऊन थांबल्या नंतर कार चे द्वार उघडताच तिन्ही मुले निपचित पडली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कार मध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहिती नुसार फारुखनगरच्या मोहम्मदिया मस्जिदजवळ राहणारीआलिया फिरोज खान (वय ६), आफरीन इर्शाद खान (वय ६) आणि तौसिफ फिरोज खान (वय ४), ही तीन मुले शनिवारी दुपारी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी आजूबाजूच्या भागांमध्ये शोध घेतल्यावरदेखील न आढळल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनीदेखील विविध माध्यमांतून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरदेखील पोलिसांनी माहिती प्रसारित केली. रविवारी दुपारनंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या माध्यमातून शोध सुरू केला. त्यावेळी एका वाहनाजवळ श्वानाने इशारा दिला. पोलिसांनी कार उघडून पाहिली असता त्यात तिघेही निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे परिसरात शोककळा पसरली होती.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
फारुखनगर भागात ही घटना वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळाजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन, उपायुक्त गोरख भामरे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता
या मुलांचा नेमका मृत्यू कसा झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहे. घटनास्थळाजवळ राहणारे रहिवासी व पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कार काही दिवसांपासून या मुलांच्या घराजवळच उभी होती. खेळता खेळता मुले आत गेली व लॉक झाल्याची शक्यता आहे. गरमीमुळे कारच्या आतील तापमान वाढले असावे व त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. कारच्या काचांना काळी फिल्म असल्याने बाहेरून लोकांना मुले दिसली नसतील व त्यांचा आवाजदेखील बाहेर येऊ शकला नसेल. दरम्यान, लॉक नव्हती का व वर्दळीचा भाग असताना मुले आत कशी गेली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.