असं गाव जिथे नाही दोन मजली घर आणि गावात होत नाहीत लग्न
हिवरा चौंढाळा ( पैठण)/ नवप्रहार डेस्क
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे महात्म्य वेगळे आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेले लोक तेथील चालीरीती आणि रूढी परमपरेचे अगदी भक्ती भावाने पालन करतात. या ठिकाणच्या लोकांना संबंधित देवी देवतांचा चमत्कार दिसल्याने ते याबद्दल आपले अनुभव कथन करतात. आज आम्ही आपणाला पैठण तालुक्यातील हिवरा चौंढाळा गावातील रेणुका मातेचं उपशक्तीपीठ असलेल्या देवस्थानचे महात्म्य आणि या गावाची खासियत सांगणार आहोत.
येथे श्रीक्षेत्र माहूरगडावरील रेणुकामातेचं उपपीठ आहे. इतर देवस्थानांच्या तुलनेत येथे काही घालून दिलेल्या प्रथा, रुढी परंपरांचे येथील सर्वधर्मीय समाज आजही काटेकोरपणे पालन करतात.
येथील देवी ही कुमारिका असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे चोंढाळा गावात लग्न समारंभ न करता वेशीबाहेर गावाला लागून असलेल्या विहामांडवा शेत शिवारातील मारुती मंदिर परिसरात पार पडतात.
विशेष म्हणजे, रेणुकामाता ही बाजेवर निद्रा करते. या आख्यायिकेमुळे येथील ग्रामस्थ बाज, पलंग, दिवाण झोपण्यासाठी कधीच वापरत नाहीत. घरामध्ये तयार केलेल्या सिमेंट किंवा मातीच्या ओट्याचा वापर झोपण्यासाठी केला जातो, ही परंपरा आजतागायत सुरूच आहे.
गावच्या वेशीबाहेरच होतात लग्न समारंभ
गावातील देवीच्या मंदिराला कळस नाही. त्यामुळे मंदिरापेक्षा उंच घर किंवा दुमजली घर येथे बांधण्यात येत नाही. त्यामुळे एकही दुमजली घर नाही. रेणुकामातेचा विवाह करण्याचा घाट एका राक्षस राजाने (राक्षसी वृत्ती) घातला होता. तेव्हा देवदेवतांना प्रश्न पडला होता की, या राक्षसाबरोबर रेणुकेचा विवाह झाला तर अनर्थ होईल, अराजकता माजेल तेव्हा हा होणारा विवाह होता कामा नये. तोपर्यंत इकडे चोंढाळा येथे विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. वऱ्हाडी स्थळी आले, तोपर्यंत तिथे उपस्थित वऱ्हाडी शेवटची घटका मोजत होते. त्याच वऱ्हाडी मंडळींचा पाण्याअभावी मृत्यू होऊन दगडी शिळेत रूपांतर झाले.
गावात देवीच्या मंदिराशिवाय कोणतेच मंदिर नाही
हिवरा चौंढाळा येथे रेणुकादेवीच्या मंदिराशिवाय दुसरे कोणतेच मंदिर गावात नाही. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. दहाव्या दिवशी दसरा सणाने सांगता होते. दरवर्षीप्रमाणे सध्या मंदिर परिसरात यात्रा भरलेली असून रोज हजारोंच्या संख्येने भाविक येऊन दर्शन घेत आहेत.
रेणुका मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच समोर गाभाऱ्यातील रेणुकामातेचा भव्य तांदळा असून चोंढाळा देवी, रेणुकामाता, जगदंबा देवी, अशा विविध नावाने ही देवी ओळखली जाते. नवरात्री व चैत्र पौर्णिमेला अशी वर्षांतून दोनदा येथे यात्रा भरते. या दोन्ही सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.