नूतन कन्या शाळेत अवतरली पंढरीची वारी
आषाढी एकादशी निमित्त नूतन कन्या महाविद्यालयाचा उपक्रम
भंडारा: नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, पा. वा. नवीन मुलींची शाळा, तसेच अरुणोदय बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची परंपरा जपत, ढोलताशाच्या गजरात व लेझीमच्या तालावर भव्य वारकरी दिंडीने नूतन कन्या शाळेत जणू पंढरीची वारी अवतरली होती. आषाढी एकादशी निमित्त नूतन कन्या महाविद्यालयाने विविध उपक्रम राबविले.
या प्रसंगी न्यू गर्ल्स स्कूल संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम. एल. भूरे, सचिव शेखर बोरसे, कार्यकारिणी सदस्य प्रमोद पनके, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविंद्र सोनटक्के, प्रमुख अतिथी रामदासजी शहारे, कार्यकारिणी सदस्य करुणा इनकने, विजय हाडगे, वीणा कुर्वे, शाळेच्या माजी प्राचार्य शीला भुरे, माजी उपमुख्याध्यापक सुरेखा डुंभरे, विद्यमान प्राचार्य निलू तिडके, पा. वा. नवीन मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापक सुनीता पटोले, अरुणोदय बालक मंदिरच्या मुख्याध्यापक मीरा धास्कट, विलास केजरकर, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, पर्यवेक्षक श्रध्दा रामेकर, प्रिया ब्राह्मणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विठू माऊली व संत पालखीचे पूजन, ग्रंथदिंडी व वृक्ष दिंडीचे पूजन करण्यात आले. विठ्ठल रखुमाईच्या व संतांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थिनी व चिमुकल्यांचे पालखी सोहळ्यात कौतुक करण्यात आले. दिंडीची सुरूवात नूतन कन्या शाळा ते बजरंग चौक, गुर्जर चौक, डॉ. हेडगेवार चौक, जलाराम चौक मार्गे गांधी चौक पर्यंत झाली. गांधी चौकात ढोलताशा, लेझीमच्या गजरात, तुळशी वृंदावन व कलश धरून विठ्ठल नामाच्या गजरात, महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेत असलेल्या विद्यार्थिनींनी रिंगण घातले.
वारकरी दिंडीचे दृश्य बघून शहरात जणू विठुरायाची पंढरी अवतरल्याचे प्रत्येकाला वाटत होते. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हरितसेना विभागातर्फे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्लास्टिक बंदी, नवभारत साक्षरता, व्यसनमुक्ती अश्या विविध विषयावर फ्लेक्स द्वारे समाज प्रबोधन हे आजच्या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
*वाटसरूंना थांबावे लागले १५ मिनीटे*
वारकरी दिंडीत तिन्ही शाळेतील जवळपास दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्याने संपूर्ण मार्गावर भाविकांची रांगच-रांग पहावयास मिळत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला-हरि नाम विठ्ठलाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना १५ मिनिटांपर्यंत थांबावे लागले. पोलीस विभागाच्या सुनियोजित सहकार्याने सर्व शक्य झाले.
वारकरी दिंडीचा समारोप विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात महाआरती व महाप्रसाद देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी मोहरील यांनी केले. पालखी सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नूतन कन्या शाळा, पा. वा. नवीन मुलींची शाळा, अरुणोदय बालक मंदिर येथील सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालकवृंद, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन, हरित सेना विभाग, सांस्कृतिक विभाग आणि सर्व विदयार्थिनी सह क्रीडा विभाग प्रमुख बेनीलाल चौधरी व खेळाडूंचे विशेष सहकार्य लाभले