पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू ; सुटी मित्रांच्या जीवावर बेतली तर मुलगा गेला वाहून
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
राज्यात पावसाने कहर केला आहे. जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटना राज्यात सगळीकडे घडत आहेत.भिवंडीत गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात घडलेल्या घटनेत मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
भिवंडी शहरात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. माती खणलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने काही मुलं त्याठिकाणी पोहायला गेले होते. त्यातील दोन मुलांचा मृत्यू झाला .ही घटना शनिवारी सायंकाळी भिवंडी शहरातील पोगाव डोंगरपाडा परिसरात घडली आहे.अली अन्वर शेख (वय 17 वर्ष) व सानीब रईस अन्सारी (वय 16 वर्ष) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत.
मित्रांनी दिलेल्या माहिती नुसार अली व सानीब हे दोघेही शांतीनगर परिसरात राहणारे होते. पोगाव डोंगरपाडा येथे खड्ड्यांमध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी मित्रां सोबत गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी शेजारील नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तर युवक राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. या ठिकाणी मागील चार वर्षात अशा पाण्यात बुडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन आणखी किती मुलांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दुसरी घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर येत आहे. तालुक्यातील मुंडीपार (खुर्द) येथील पांगोली नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. २९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. गंगाधर भिवाजी भरणे (वय १६) व आर्यन शैलेशकुमार शहारे (वय १६, दोघेही रा.मुंडीपार) अशी मृतांची नावे आहेत.
दोन्ही मुलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. मोहरमनिमित्त शनिवारी शाळेला सुटी असल्यामुळे गंगाधर व आर्यन हे दोघेही सकाळी साडेदहाच्या सुमारास गावाजवळून वाहणाऱ्या पांगोली नदी शेतशिवारात आपापल्या घरातील शेळ्या चारण्याकरिता गेले होते.
अशात नदीपात्राजवळून जात असताना आर्यनचा चिखलातून पाय घसरल्यामुळे तो नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा सोबती गंगाधरनेही प्रयत्न केले. मात्र, पाणी खोलवर असल्यामुळे तोही नदीपात्रात पडला. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. गंगाधर इयत्ता नववीचा तर आर्यन हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सालबर्डीच्या माळू नदीत मुलगा गेला वाहून
मोर्शी : पिंपळखुटा मोठा येथील मोंगरकरपुऱ्यातील बरेच लोकं अधिकमासानिमित्त सालबर्डीतील माळू नदीत अंघोळीला गेले होते. या नदीत अंघोळ करीत असताना एक १५ वर्षीय मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो सापडून आला नाही. पिंपळखुटा मोठा येथील कार्तिक गोविंदा भुजाडे (वय १५) हा गावातीलच कुटुंबासोबत सालबर्डीला गेला होता.
सालबर्डीतील माळू नदीच्या संगमावर पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. समोरच हत्तीडोह असल्यामुळे मुलाचा पत्ता लागला नाही. तहसीलदार सागर ढवळे यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अमरावतीवरून लगेच रेस्क्यू टीमला बोलविले. नदीमध्ये शोध घेतला. मात्र रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. मोर्शी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल चौकशी करीत आहेत.