पैशे कमावण्याचा नवीन फंडा ; तो जोरजोराने ओरडून श्रद्धाळूना करतोय आकर्षित
प्रयागराज / नवप्रहार डेस्क
जगात पैश्याची काही कमी नाही फक्त तो कमावता आला पाहिजे असे मिश्कीलपणे म्हटल्या जाते. आणि ते खरे देखील आहे. कारण अनेक लोकांना आपण जेव्हा काही तरी नवीन करताना पाहून त्यांना पैशे कमावताना पाहतो त्यावेळी आपल्याला ही आयडिया मला का सुचली नाही ? असा प्रश्न पडतो. आम्ही आता जे आपल्याला सांगणार आहोत त्यावेळी अगदी असाच प्रश्न तुम्हाला देखील पडेल.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तुम्हाला अशा लहान लहान उद्योगातून हजारोंची कमाई करणारे अनेक लोक दिसतील. हे लोक पैसा कमावण्यासाठी रोज संधीचा फायदा घेत, काही ना काही प्लॅन तयार करत असतात. अशा प्रकारे एका व्यक्तीने गंगा नदीत पैसा कमावण्याचा एक अनोखा फंडा शोधलाय, ज्यातून तो रोज हजारोंची कमाई करतोय. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गंगा नदीत थंडीच्या दिवसांत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी त्याने एक नवा प्लॅन तयार केलाय. गंगा नदी ही पवित्र नदी मानली जाते. तेथे स्नान केल्यास सर्व पापे धुतली जातात, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देशभरातील अनेक लोक एकदा तरी गंगेच्या काठी स्नानासाठी जातात. पण, सध्या थंडी असल्यामुळे गंगा नदीतील पाणी बर्फासारखे थंड झालेय. अशा परिस्थितीत अनेकांना गंगेत स्नान करणे अवघड वाटतेय. याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने लोकांना गंगा घाटावर थंड पाण्यात अंघोळ करण्याची गरज नाही, असे सांगत म्हटले की, फक्त नाव सांगा आणि १० रुपयांची स्लिप घ्या. तुमच्या बदल्यात मी गंगा नदीत स्नान करेन आणि तुमच्यासाठी पुण्यप्राप्तीसाठी प्रार्थना करेन.
तो लोकांना पटवून देतो की, तुम्हाला गंगा नदीत उतरण्याची गरज नाही. मीच तुमच्यासाठी गंगा नदीत स्नान करून प्रार्थना करेन.
१० रुपयांत तुमच्यासाठी तो गंगा नदीत करेल स्नान
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती गंगा नदीतील एका खांबावर बसली आहे. यावेळी तो लोकांना आपल्या योजनेच्या वैशिष्ट्याबद्दल मोठमोठ्याने ओरडून सांगताना ऐकू येतेय. व्हिडीओमध्ये तो म्हणतोय, ‘या बंधू-भगिनींनो, मी तुमच्या नावाने गंगेत डुबकी घेईन. या थंड वातावरणात तुम्हाला गंगेत डुबकी घ्यायची नसेल, आंघोळ करायची नसेल तर. फक्त तुमचे नाव सांगा आणि १० रुपयांची पावती घ्या. मी तुमच्या नावाने पुण्यप्राप्तीसाठी प्रार्थना करीन. त्यासाठी तुम्हाला फक्त १० रुपये द्यावे लागतील, जे आम्हाला मिळतील.
हा मजेशीर व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, पैसा सर्वत्र आहे. तुम्हाला फक्त तो कसा कमवायचा हे माहीत असणे आवश्यक आहे. दुसऱ्याने लिहिले की, भाऊ सोन्याची चेन घालून १० रुपये घेऊन डुबकी मारत आहे. तिसऱ्याने लिहिले की, भावा, मला तुझा नंबर दे. आम्हाला घरी बसून गंगेत डुबकी मारायची आहे. चौथ्याने लिहिलेय की, भारतातील बेरोजगार युवक. शेवटी एकाने लिहिलेय की, हा एक व्यवसाय आहे.