त्या सामूहिक आत्महत्येमागील गूढ उकलण्यात यश
गंगाखेड / प्रतिनिधी
रेल्वे रुळावर झालेल्या सामूहिक आत्महत्ये प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. बदनामीच्या भीतीने या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या कुटुंबातील तरुणीला माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी शिक्षकी कुटुंबाला सहन न झाल्याने ही आत्महत्या घडल्याचे मूळ कारण आहे.
शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याचे यातून पुढे आले आहे. यात आरोपी युवकास गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना व मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने गंगाखेड हादरले होते. या घटनासंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. याप्रकरणी मयताचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे (रा. किन्नी (कदू), ता. अहमदपूर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (२१, रा. परभणी) या युवकाविरुद्ध गंगाखेड ठाण्यात गुरनं ७६४/२०२४ कलम १०८ भा.न्या.सं.अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीडीआर, आयओंचे तपास कौशल्य, आरोपी निष्पन्न
या घटनेचा तपास करणे पोलिसांना आव्हान होते. मात्र, तपास अधिकारी सपोनि. सुनील इंगळे यांच्या तपास कौशल्यास यश आले. आरोपी युवकाच्या मोबाइल सीडीआरवरून तपास अधिकाऱ्यांना संशय बळावला. चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस व कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचे कबूल केले. यावरून ४ डिसेंबर रात्री ११:३० वाजता गंगाखेड ठाणे डायरीत ५३/२०२४ नुसार नोंद घेण्यात आली. गुरुवारी दुपारी आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
घटनेची पूर्वपार्श्वभूमी
फिर्यादीच्या तक्रारीनुसार घटनेची पूर्वपार्श्वभूमी पुढीलप्रमाणे : या प्रकरणातील आरोपीने फिर्यादीची मयत पुतणीसोबत लग्न करून द्या, नाही तर तिच्यासोबत असलेले काढलेले व्हिडीओ व फोटो हे व्हायरल करून तुम्हा सर्वांची बदनामी करेल, तसेच संबंधित मुलीसोबतचे आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल केले. त्यामुळे होत असलेल्या बदनामी व मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादीचा भाऊ मसनाजी तुडमे, रंजना तुडमे व अंजली तुडमे तिघांनी एकत्रित रेल्वे रुळाखाली सामूहिक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे करीत आहेत.