विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे मुख्याध्यापकांना दुर्लक्ष करणे पडले महागात

मुंबई / नवप्रहार डेस्क
लहान वयात मुलं खोडसाळ असतात. त्यांच्या खोड्याकडे अनेक वेळा शिक्षक दुर्लक्ष करतात. काही वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षाही करतात. पण एका विद्यार्थ्यांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करणे मुख्याध्यापकांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. प्रकरण पश्चिम बंगाल मधील एका शाळेतील आहे.
पश्चिम बंगालमधील कयोटा येथील कोशीग्राम युनियन हायस्कूलचे मुख्याध्यापक पूर्णेंदू बंदोपाध्याय यांना गुरुवारी कटवा पोलिसांनी अटक केली आहे. इंद्रजित माळी या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पालकांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केलं.
विद्यार्थ्यासोबत काय झालं?
मयत विद्यार्थी इंद्रजित याचे घर कोशीग्राम बांधपारा येथे आहे. मंगळवारी शाळेत जात असताना त्याला साप चावला. हा प्रकार विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना सांगितला. मुख्याध्यापकांनी शाळेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याच्यावर उपचार करण्यास सांगितले. चतुर्थ श्रेणीतील एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याच्या पायाच्या जखमेवर डेटॉल लावलं आणि त्याला सोडून दिलं. सर्पदंश झाल्यानंतरही विद्यार्थ्याला सुटी देण्यात आली नाही आणि वर्गात जाण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात आला आहे.
दुपारी घरी परतल्यानंतर विद्यार्थी अधिकच सुस्त झाला. काही वेळाने त्याला उलट्या होऊ लागल्या. दुपारी चारच्या सुमारास त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर कुटुंबीयांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेबाबत पालकांनी गुरुवारी शाळेत जोरदार निदर्शने केली. शाळेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
यानंतर पोलीस शाळेत पोहोचले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्यांनी मुख्याध्यापक पूर्णेंदू बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बाल न्याय कायद्याची कलमेही जोडण्यात आली, यानंतर मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. शाळेत सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या अटकेला अन्य शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे.