वडील येत होते प्रेमाच्या आड , मुलीने प्रियकराच्या मदतीने विष देऊन केले ठार

तीन वर्षांनंतर प्रियकरानेच फोडले बिंग
चंद्रपूर / विशेष प्रतिनिधी
प्रेमात मनुष्य आंधळा होतो असे म्हणतात. त्याला प्रेमापुढे दुसरे काहीच दिसत नाही. मग ते प्रेमाला विरोध करणारे आईवडील का असेना . प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीने प्रियकराच्या साह्याने यमसदनी झाडल्याचा धक्कादायक प्रकार प्रियकराच्या तक्रारी नंतर उघड झाला आहे. पोलिसांनी मुलगी, तिचा प्रियकर आणि या कामात त्यांना मदत करणाऱ्या आणखी दोघांना विविध कलमा अंतर्गत अटक केली आहे.
23 मार्चला पोलीस निरीक्षक, रामनगर यांच्या नावाने भद्रावती मध्ये राहणारे 30 वर्षीय पोलीस कर्मचारी आशिष महेश शेडमाके यांनी तक्रार अर्ज दिला, ज्यामध्ये आशिषने प्रेयसी महिला पोलीस आर्या जयंत बाल्लावार यांच्यावर हेड कॉन्स्टेबल वडील जयंत बाल्लावार यांना विष देत ठार केल्याची माहिती दिली.
पाच हजार रुपये देऊन घेतले विष
आशिष शेडमाके व महिला पोलीस अंमलदार आर्या जयंत बाल्लावार यांचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या संबंधाबाबत आर्याच्या वडिलांना चाहूल लागली होती. यावरून वडील आर्या सोबत वाद घालत मारहाण करीत होते. या कारणावरून आशिष व आर्याने जयंत बाल्लावार यांना विष देत ठार मारण्याचे ठरविले. मात्र विष कुठून घ्यायचे असा प्रश्न आशिष पुढे उभा राहिला त्याने याकरिता मावशीच्या अल्पवयीन मुलाला विष मिळेल का असे विचारले. मावशीच्या मुलाने 22 वर्षीय चैतन्य सचिन गेडाम (राहणार भद्रावती, चंद्रपूर) याला संपर्क करीत प्रेम प्रकरण व त्यावरून होणाऱ्या वादाची माहिती देत आर्याच्या वडिलांना विष देऊन ठार मारण्यासाठी विष हवे असे सांगितले. 24 एप्रिल 2023 ला चैतन्यने आशिषला काचेच्या बाटलीत विष आणून दिले. त्यासाठी आशिषने चैतन्यला 5 हजार रुपये दिले.
मिल्कशेकमध्ये मिसळून वडिलांना दिला
25 एप्रिल 2023 ला आर्याने वडील जयंत बाल्लावार यांना मिल्कशेकमध्ये विष टाकत ते पिण्यासाठी दिले. मिल्कशेक पिल्यावर जयंत बाल्लावार हे ड्युटीवर जाण्यासाठी प्रशासकीय भवन मध्ये गेले असता त्याठिकाणी त्यांना चक्कर आली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासत मृत घोषित केले. विशेष बाब म्हणजे चौकशीवेळी आर्याने पोलिसांना खोटी साक्ष दिली होती. तब्बल 3 वर्षानंतर आशिष शेडमाके यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देत या प्रकरणाचा उलगडा केला. विशेष बाब म्हणजे आरोपी महिला पोलीस असल्याने त्यावेळी पोलिसांनी चौकशीमध्ये गांभीर्य दाखविले नाही. अन्यथा हा गुन्हा तीन वर्षांपूर्वीच उघडकीस आला असता.
तीन वर्षांनी ‘असं’ बाहेर आलं प्रकरण
तीन वर्षांनी रामनगर पोलिसांनी मर्ग बी पार्टचे अवलोकन केले त्यामध्ये जयंत बाल्लावार यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा अभिप्राय होता. पण तीन वर्षांनी पोलीस कर्मचारी आशिष शेडमाके यांनी तक्रार अर्ज का केला याबाबत रामनगर पोलीस स्टेशनचे पोउपनि दराडे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, ‘वर्ष 2022 पासून आशिष व आर्याचे प्रेमसंबंध होते, त्याबाबत वडिलांना चाहूल लागली. वडिलांचा काटा त्या दोघांनी वर्ष 2023 ला काढला, त्यानंतर आर्या व आशिष हे दोघे 1 ते 2 वर्षे प्रेमाच्या आणाभाका घेत राहिले, त्यांनतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. यामुळे सततच्या वादाला कंटाळून 3 वर्षांपूर्वीची घटना आशिषने उघडकीस आणली.’ आशिष व आर्या हे वर्ष २०२५ मध्ये चंद्रपूर पोलीस दलात दाखल झाले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची ट्रेनिंग संपली होती.
रामनगर पोलिसांनी या प्रकरणात आशिष महेश शेडमाके, चैतन्य उर्फ मोंटी सचिन गेडाम, महिला पोलीस अंमलदार आर्या जयंत बाल्लावार, विधिसंघर्ष मुलावर यांच्यावर कट रचून जयंत बाल्लावार याना ठार करीत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम 120 (ब), 302, 201 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चारही आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.




