काका म्हणवुन घेणाऱ्याने केला घात

पुणे:/ नवप्रहार डेस्क
त्याचे तिच्या घरी येने जाणे असल्याने ती तिला काका म्हणायची. पण याच काकाने तिचा घात केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुख्य म्हणजे या तरुणीचा पती कामावर गेला होता. तेव्हा तिची हत्या करून मृतदेह पलंगाच्या बॉक्स मध्ये ठेवला. पती घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
स्वप्नाली उमेश पवार (२४, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असे मृत महिलेचे नाव आहे. स्वप्नाली हिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. पवार दाम्पत्याच्या घरी नेहमी येणाऱ्या व्यक्तीने (ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे) हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत तिचा पती उमेश पवार (३६, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०० ते ८ नोव्हेंबर सकाळी ७:००च्या दरम्यान घडला होता. उमेश पवार हे उबेर टॅक्सीचालक आहेत. त्यांना बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री गाडी घेऊन गेले होते. भाडे सोडून सकाळी ते परत घरी आले तेव्हा त्यांना घराला बाहेरून कडी लावलेली दिसली. घरात त्यांची पत्नी नव्हती. त्यांनी परिसरात शोध घेतला तरी ती आढळून आली नाही. घरातील दागिने, पैसे व तिचा मोबाइलही दिसून आला नाही. तेव्हा त्यांनी पलंगाच्या बॉक्समध्ये दागिने व सोने आहेत का? हे पाहण्यासाठी पलंग उघडला, तेव्हा आत स्वप्नालीचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात स्वप्नालीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता त्यांच्याकडे नेहमी येणारा ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, तो येऊन गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिस त्या ‘काका’चा शोध घेत असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर करत आहेत.