नयन खोडपे याची हत्याच ; हातपाय बांधलेल्या स्थितीत नाल्यात आढळला होता मृतदेह
प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल
भंडारा (जवाहरनगर) :-
कोरंभी-सालेबर्डी रस्त्यावरील पंडीत नाल्यात पुलाखाली दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.४५ वाजता दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पाण्यावर तरुणाचे प्रेत तरंगतांना आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली होती. मृतदेहाचे हात-पाय बांधून त्याचा गळा आवळून हत्या केल्याचे आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकण्यात आले होते.
मृतदेह मुकेश खोडपे याची हत्याच ; हातपाय बांधलेल्या स्थितीत नाल्यात आढळला होता मृतदेह हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी लक्षात आले होते . त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता. .
जवाहरनगर जवळील सालेबर्डी (खैरी) येथील उपसरपंच जितेंद्र गजभिये हे मोटारसायकलने काही कामानिमित्त कोरंभी मार्गे भंडार्याला जात असतांना कोरंभी रस्त्यावरील पंडीत नाल्यावर लघुशंकेकरीता मोटारसायकल थांबविली. तेव्हा त्यांना पुलाखाली नाल्यातील पाण्यात एका युवकाचे प्रेत तरंगतांना दिसून आले. याची माहिती सालेबर्डी येथील पोलीस पाटील हिरालाल पुडके व तंमुस अध्यक्ष टोमदेव तितिरमारे यांचेसह जवाहरनगर पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच जवाहरनगरचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलीसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मासेमारी करणार्या कोडी बांधवांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले. तेव्हा मृतकाचे हात-पाय दोराने बांधल्याचे दिसून आले. गळा सुध्दा आवळल्याचे तसेच मानेवर व पोटावर जखमा आढळून आल्या. सदर युवकाची हत्या करुन त्याचे हात-पाय बांधून नाल्यात फेकण्यात आले असावे, असा अंदाज वर्तविण्यात आला. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव, स्थागुशा पो.नि. नितीन चिंचोळकर, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली. पोलीसांनी मृतकाची ओळख पटविण्यास यश आले. नयन खोडपे रा.पांढराबोडी, अशी मृतकाची ओळख त्याच्या कुटूंबियांनी केली आहे.
पांढराबोडी येथील नयन खोडपे हा दि.२७ नोव्हेंबर रोजी रात्री मोटारसायकल घेऊन घरुन निघून गेला होता. त्याच्या कुटूंबियांनी दि.२८ नोव्हेंबर रोजी वरठी पोलीसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, आजी, एक भाऊ, असा परिवार असून त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुधीर बोरकुटे, पो.हवा.मंगल कुथे करीत आहेत.
दोघांना घेतले चौकशीकरीता ताब्यात –
सालेबर्डी लगतच्या नाल्यात हात-पाय व गळा आवळलेल्या स्थितीत नयन खोडपे या तरुणाचा संशयास्पद स्थितीत प्रेत आढळून आल्याने त्याची हत्या करुन प्रेत नाल्यात फेकल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला. पोलीसांनी धारगाव येथून एकाला व भोजापूर येथून दुसर्याला असे दोघाजणांना चौकशीकरीता ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा कुटूंबियांचा आरोप –
शेतीचे काम करणार्या प्रणय याची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांकडून केला जात आहे. मृतक हा मोटारसायकलने एका तरुणीला भेटण्यासाठी घराबाहेर गेल्याचे सांगितले जात आहे. प्रेम प्रकरणातून त्याची हत्या करुन त्याचे हात-पाय बांधून गळा आवळून त्याला नाल्यात फेकण्याचा आरोप मृतकाच्या कुटूंबियांकडून केला जात आहे.
तहसील कार्यालय परिसरात आढळली मोटारसायकल –
मृतक नयन हा मोटारसायकलने दि.२७ नोव्हेंबर रोजी घरुन निघून गेला होता. ती मोटारसायकल दि.३० नोव्हेंबर रोजी भंडारा तहसील कार्यालय परिसरात एका पानठेल्यामागे दिसून आली. सदर मोटारसायकल तहसील कार्यालय परिसरात दिसून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.