सध्याच्या राजकीय घडामोडीं त कार्यकर्ते तोफेच्या तोंडी , नेते मात्र अलिप्त -भाऊसाहेब खेडेकर
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – नगर जिल्ह्यामध्ये नेत्यांचे कट्टर कार्यकर्ते होणे म्हणजे अंगावर पोलीस कारवाई करून घेणे आलेच. कार्यकर्त्यांची कट्टरता त्याच्याविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत, त्यावर ठरते.
असे असूनही ना नेते सुधारतात ना कार्यकर्ते , अशी प्रतिक्रिया पारनेर चे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी व्यक्त केली आहे .
मुख्य म्हणजे अशा राजकारणाचा बहुतांशी नागरिकांना तिटकारा येत नाही. आला तरी तो कृतीतून दिसत नाही. उलट अनेकांना हेच भारी वाटते, हे दुर्दैव! एकदा का गुन्हा दाखल झाला की, तो कार्यकर्ता नेत्यांचा पक्का होतो. गुन्ह्यातून सुटण्यासाठी आणि विरोधकांपासून संरक्षण मिळविण्यासाठी त्याला नेत्यासोबतच रहावेच लागते. कार्यकर्ते घडविण्याची, त्यांना पोसण्याची सुपीक जमीनच जणू राजकारणी नेतेच बनवत आहेत. इतरांचाही नाइलाज असतो. नगर जिल्ह्यामध्ये दुसरे करण्यासारखे काहीच नाही, असे म्हणतात. बाहेर जाण्याची शैक्षणिक व आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे पोटापुरते मिळते आणि पोरगं डोळ्यासमोर राहते म्हणून पालकांनाही मूकसंमती देण्याशिवाय पर्याय नसतो.
निवडणुका आल्या की , दहशतमुक्ती हा प्रचारात मुद्दा असतो. एकमेकांकडे बोट दाखवून त्यांची दहशत असल्याचा आरोप होतो. नागरिकांना भीती दाखवून संरक्षणाचे आश्वासन देत मते मिळविली जातात. रोजच्या होणाऱ्या मारामाऱ्या पाहून लोकांना खरेच असुरक्षित वाटू लागलेले आहे. त्यामुळे तेही याला बळी पडतात. म्हणजे काय तर या मारामाऱ्यांमुळे कार्यकर्ते आणि मतदार दोघांना आपल्याकडे जोडून ठेवण्यासाठी नेत्यांना त्याचा खूप उपयोग होतो. आजच्या घडीला हे दुष्टचक्र भयानक टप्प्यावर आले आहे. ठरवूनही कोणी यातून बाहेर पडू शकणार नाही किंवा त्याला तसे बाहेर पडू दिले जाणार नाही. कारण सगळ्यांचे व्यवसाय आणि धंदे यावर अवलंबून आहेत ,अशी स्थिती आहे. हाच नगर जिल्हयाच्या राजकारणाचा खरा गाभा बनला आहे. बाकी पक्ष, विचार, विकास एवढेच केवळ बोलायच्या गोष्टी आहेत. सन्माननीय अपवाद असू शकतात .
हे चित्र कधी व केव्हा आणि कसे बदललेल ? हे सांगणे कोणत्याही तुडमुड्या ज्योतिषा ला ही शक्य होणार नाही , असे हे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी सांगितले आहे .