वेषांतर करून केली खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

निमगाव / विशेष प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीसांनी वेषांतर करत अटक केल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. नातेवाइकाच्या अंत्यविधी आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्टमध्ये निमसे विरुद्ध धोत्रे टोळीत झालेल्या वादातून राहुल धोत्रे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी मारेकरी सचिन दहिया उर्फ गोलू (२४, रा. निमुआ, जि. सतना, मध्यप्रदेश) हा फरार झाला होता.
गुंडाविरोधी पथकाने त्याच्या गावात धडक देत तीन दिवस मुक्काम ठोकून एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी तो आला असता वेशांतर करत शिताफीने सिनेस्टाइल त्याला जाळ्यात घेतले.
२२ ऑगस्ट रोजी झालेल्या वादातून नांदुरनाका, नांदुरगाव परिसरात निमसे टोळीने आकाश धोत्रे त्याचा भाऊ राहुल धोत्रे यांच्यावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात राहुलच्या पोटात वर्मी घाव लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांच्यासह पाच ते सहा संशयितांच्या टोळीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. हा गुन्हा घडल्यापासून सचिन हा फरार झाला होता. या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.
सचिन मध्य प्रदेशात असल्याची माहिती मिळाली आणि…
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी त्यास शोधण्याचा ‘टास्क’ गुंडाविरोधी पथकाला सोपविला होता. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे यांनी माहिती काढली असता त्यांना सचिन हा मध्यप्रदेशला असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली.
त्यांनी पथक सज्ज करत सतना गाठले. बुधवारी (५ नोव्हेंबर) नागौद पोलिस ठाण्याच्या हद्दीत माहिती काढत असताना गिंजारा गावात मार्बल फिटिंगची कामे करून तो नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्याचे समजले. पथकाने रात्री त्या गावात जाऊन वेशांतर करत सापळा रचला.
अंत्यसंस्कारावेळी सचिनचा सहभाग
स्मशानभूमीत एका व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांचे पथक गावकऱ्यांच्या वेशात त्याठिकाणी उपस्थित राहिले. तेथे त्यांनी संशयित सचिन यास ओळखून अंत्यविधी आटोपल्यानंतर शिताफीने त्याला बाजूला घेतले. यावेळी पोलिस असल्याची त्याला कुणकुण लागताच तो मळ्यांकडे पळू लागला होता. पथकाने त्याचा पाठलाग करत ताब्यात घेतले.
मार्बल बसविण्याचे करायचा काम
सचिन हा आडगाव, नांदुरनाका भागात एकटा राहून मार्बल बसविण्याची कामे करायचा. ज्यादिवशी टोळक्याने हल्ला केला, तेव्हा त्याचाही त्यात सहभाग होता. लोखंडी सळईने राहुलवर त्याने वार केले होते, असे पोलिसांनी सांगितले.




