शिक्षक मतदार संघाची लढत रंगणार !
मुंबई / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुर्व नियोजित कार्यक्रमानुसार या निवडणूक दहा जुन 2024 रोजी होणार होत्या.शैक्षणिक सत्र मात्र 15 जुन रोजी सुरू होणार आहे. यामुळे शिक्षक मतदार संघातील साऱ्याच उमेदवारांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. आमदार कपिल पाटील यांनी तर चक्क आपले उमेदवार सुभाष मोरे यांना घेऊन दिल्ली गाठली व न्यायालय दाद मागितली. निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार नुसार ही निवडणूक सध्यातरी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक पुढे जाताच आमदार कपिल पाटील यांनी आपले शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे व शिक्षक नेते अशोक बेलसरे यांच्यासह राज्यातील दिग्गज्ञ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः आमदार कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले ज्येष्ठ सहकारी अनिल देसाई व अनिल परब यांच्या समवेत उपस्थीत होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यासुध्दा कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या महाविकास आघाडीतील एक मुख्य घटक म्हणून आमदार कपिल पाटील हे सक्रिय आहेत. गेली अठरा वर्षे ते मुंबई शिक्षक मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत आहेत. समाजवादी गणराज्य पक्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण उध्दव साहेब ठाकरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत वायव्य मतदार संघातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या जाहीर सभेत युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या समवेत व्यासपीठावर आमदार कपिल पाटील उपस्थीत होते. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटक कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीच्या कार्यक्रमात संजय राऊत व शरद पवार यांनी उपस्थीती लावली होती. दोन्ही दिग्गज नेत्यांनी आमदार कपिल पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले होते. अशा परिस्थितीत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
शिक्षक व पदवीधर मतदार संघात चुरस आता पाहायला मिळणार आहे. पदवीधर मतदारसंघातून अद्याप तरी लढाईला सुरुवात झाली नसली तरी विधान परिषदेतील सर्वात सुज्ञ व विद्वानांच्या प्रतिनिधींसाठी लढत चांगलीच रंगणार आहे.
शरद पवार यांच्या भेटी संदर्भात आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही पंरतु शरद पवार साहेबांनी काय आश्वासन दिले हे गुलदस्त्यात आहे.परंतु यावेळी महाविकास आघाडीतील दोन घटक एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिक्षक उमेदवार ज.मो. अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे त्याचबरोबर हेमंत गजरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा रिंगणात उतरलेले आहेत तर भारतीय जनता पक्षातर्फे अनिल बोरनारे , शिवनाथ दराडे, राजू बंडगर, तानाजी कांबळे, व इतर उमेदवारांनी आपला प्रचार दौरा यापूर्वी सुरू केला आहे. शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष मोरे यांना सक्रिय पाठिंबा व आशीर्वाद देण्याचे आश्वासन मिळाले आहे का अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात चालू आहे तर तर दुसरीकडे शिक्षक सेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांनी शाळा व गृहभेटी देऊन आपल्या प्रचारास चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे.प्रशासकिय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे एकेकाळचे शिक्षक भारतीचे नेते जालिंदर सरोदे त्यांच्या सोबत आहेत. सेना शाखा प्रमुख दीपक सणस व युवा सेना अधिकारी रमेश वाजळे यांच्या मते सर्व शिवसैनिक “शिक्षक सेनेचा” प्रचार करुन आमचा उमेदवार निवडून आणू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या या दोन उमेदवारांच्या लढतीचा फायदा मात्र आम्हालाच होईल अशी प्रतिक्रिया अनिल बोरनारे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. या ठिकाणी शिक्षक परीषद सक्रिय झाली आहे. शिवनाथ दराडे हे सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. निवडणूक पुढे ढकलण्यात आली तरी उमेदवारांचा जोश मात्र कमी झालेला नाही. समाजमाध्यमावर सगळ्याच पक्षाचे उमेदवार जोरदारपणे आपली बाजू मांडण्यासाठी संदेश पाठवत आपल्याच विजयाची खात्री देत आहेत मुंबई मध्ये अंदाजे पंधरा हजार शिक्षक मतदार असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे लवकरच कळेल!