ते नदीच्या पुलावर आले, काही काळ थांबले आणि अचानक महिलेने घेतली नदीत उडी

नवरा केविलवाण्या नजरेने हा प्रकार पाहतच राहिला
नागपूर / नवप्रहार ब्युरो
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावर घडलेल्या एका घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. येथे पती सोबत आलेल्या महिलेने पतीच्या डोक्यादेखत नदीत उडी घेतली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने पती सोबत त्या ठिकाणी उपस्थित नागरिक काही सेकंदासाठी स्तब्ध झाले होते. पतीने आरडाओरड केली पण …… हे जोडपे नदीवर निर्माल्य टाकण्यासाठी आले होते.
रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असं मृत महिलेचं नाव आहे. महिला सध्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरेसोबत राहत होती.
पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी गेले आणि महिलेचं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. त्यावेळी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या नेरी पुलावर थांबले. दोघांनी गाडी थांबवून काही वेळ त्या पुलावर घालवला. या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील काढला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेलं निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली. मात्र, निर्माल्य टाकतानाच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केली. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं.
कौटुंबिक वाद कारण असल्याची प्राथमिक माहिती
पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावं लागलं. रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं. दरम्यान, या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पती – पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिक आणि पुलावरुन जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी दिवसभरात अनेकजण घटनास्थळावर गर्दी करत होते. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून, पुलावर काढलेली दाम्पत्याचा सेल्फी हा घटनेतील अत्यंत वेदनादायक पैलू ठरत आहे. पोलिसांनी नागरिकांना अपप्रचार न करण्याचं आवाहन केलं आहे.