हटके

तरुणाला पडले स्वप्न पोलिसांना सापडला सांगाडा 

Spread the love

खेड / नवप्रहार मिडीया 

                   एखाद्या चित्रपटच्या कथानकाला साजेशी घटना खेड तालुक्यात घडली आहे. येथे एका तरुणाला जंगलात एका ठिकाणी मृतदेह जमिनीत पुरला असल्याचे स्वप्न पडले. त्याने यांची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्यांना एक मानवी सांगाडा झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. पोपिसानी  मर्ग दाखल करून तपास सुरु केला आहे. पण तरुणाच्या त्या स्वप्नाची चर्चा पंचक्रोशीत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आपल्या अहवालात ही गोष्ट नमूद केली आहे.

 सदर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचं पोलिसांच्या नोदींमुळे स्पष्ट होत आहे. सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीमधील एका व्यक्तीला ज्या ठिकाणी हा सापळा सापडला तिथेच मृतदेह असल्याचे स्वप्न पडले. त्याने सदर बाब खेड पोलिसांना सांगितली. त्यानंतरच पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना हा रहस्यमय सापळा आणि कवटी आढळून आले. या संपूर्ण घटनाक्रमाची नोंद पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या प्राथमिक अहवालामध्ये आहे.

तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि म्हणाला…

एका व्यक्तीला स्वप्न पडलं त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास केल्याची नोंद पोलिसांच्या एफआयआरमध्ये सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारे योगेश पिंपळ आर्या (वय 30 वर्ष) हे खेड पोलीस स्थानकात आले. ‘मला वारंवार स्वप्न पडतात. त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असल्याचं दिसतं. तो पुरुष माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे,’ असं योगेश यांनी पोलिसांना सांगितलं.

तपासामध्ये खळबळजनक खुलासा

योगेश यांच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची तपासणी सुरु केली. पोलिसांच्या या तपासणीदरम्यान त्यांना भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्यासारखा वास येत होता. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधलेले व टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचे प्रेत दिसले. हे प्रेत झाडाला बांधलेल्या अवस्थेत खाली पडलेले दिसले. या प्रेतावर राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट होती. अनेक दिवसांपासून हा देह इथे असल्याचं त्याचा सापळा दिसत होतं यावरुन स्पष्ट झालं. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची ‘आदिदास’ असं लिहिलेली सॅक आढळून आली. या मृतदेहापासून 5 फुटांवर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ‘ए.आय.आर’ कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच ओळखपत्र किंवा पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांनी सुरु केला आहे.

स्थानिकांना काहीच कल्पना नाही

या मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसांपासून इथेच असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. इतक्या दिवस या ठिकाणी हा मृतदेह असताना आणि दुर्गंधी पसरली असताना त्याबद्दल स्थानिकांना काहीही कल्पना नसून थेट सावंतवाडीतील एका युवकाला स्वप्नात या मृतदेहासंदर्भातील माहिती मिळाली, हे सर्वांनाच चक्रावून टाकणारं आहे. आता या प्रकरणामध्ये पोलीस कसा तपास करतात? हा मृतदेह कोणाचा आहे हे कधीपर्यंत समोर येणार याबद्दल स्थानिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close