तालुका विज्ञान प्रदर्शनीत शिवाजी शाळेचे सुयश
विज्ञान प्रदर्शनीत श्लोक कराळे द्वितीय तर वक्तृत्व स्पर्धेत कु.रिद्धी उमरकर प्रथम
मोर्शी / प्रतिनिधी
शिक्षण विभाग पंचायत समिती मोर्शी,मुख्याध्यापक शैक्षणिक मंच व विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यालय खानापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनी व वक्तृत्व स्पर्धेत स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत घवघवीत यश संपादित केले.
आजच्या काळात दुचाकी वाहनांचे वाढते अपघात व त्यातून होणारी जीवितहानी लक्षात घेता यातून मार्ग काढण्यासाठी चि.श्लोक चेतन कराळे या नववीच्या विद्यार्थ्याने विज्ञान शिक्षक संदीप दंडाळे व अमित कानफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट हेल्मेट नावाचे मॉडेल बनवले होते.या हेल्मेटचे वैशिष्ट्ये म्हणजे मोटारगाडी दुचाकीस्वार जोपर्यंत हेल्मेट डोक्यावर चढवणार नाही तो पर्यंत ती दुचाकी सुरू होणार नाही व त्यामुळे होणारी सांभाव्य प्राणहानी टाळण्यास मदत होणार असल्याचे श्लोक कराळे याने पटवून दिले.त्याच्या या समाजपयोगी प्रयोगाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून त्याच्या या प्रयोगाने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला तर वक्तृत्व स्पर्धेत याच शाळेची वर्ग सातवीची कु.रिद्धी किशोर उमरकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला असून या विद्यार्थिनीला शीतल टोळे,सुक्ष्मा राईकवार,धनश्री कोंबे,राजेस मुंगसे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख,उपमुख्याध्यापक श्रीकांत देशमुख,पर्यवेक्षक मिलिंद ढाकुलकर,उद्धव गिद,शिक्षक प्रतिनिधी अजय हिवसे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.हे दोन्ही विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे शिक्षक व आईवडिलांना देतात.