आयुर्वेदिक औषध हे सुखी आरोग्याचे रहस्य – योग शिक्षक विलास केजरकर
मुंढरी येथे आरोग्य तपासणी शिबिर, औषध वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
नवप्रहार प्रतिनिधी हंसराज भंडारा
भंडारा: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील अनियमिततेमुळे आर्थराइटिस आणि इतर आरोग्य समस्या वाढत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषधोपचार, संतुलित आहार, नियमित योगासन आणि सूर्यप्रकाशाचा लाभ घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य आणि योग शिक्षक विलास केजरकर यांनी केले.
ते जिल्हा परिषद आरोग्य विभाग, राष्ट्रीय आयुष विभागांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर व उपआरोग्य केंद्र मुंढरी (बुज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक दवाखाना मुंढरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, औषधी वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम पंचायत सरपंच पूजा वासनिक यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी आयुष्मान आरोग्य मंदिर मुंढरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बोंबार्डे होते. उपस्थित मान्यवरांनी योग-प्राणायाम, स्वच्छता आणि आरोग्याच्या महत्त्वावर विशेष टिप्स दिल्या. डॉ. नविनकुमार डेकाटे यांनी योग आणि आहाराचे महत्त्व सांगितले, तर पूजा वासनिक यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट केले.
आरोग्य तपासणी शिबिरात १०० हून अधिक लोकांनी औषध वितरणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका, आशा वर्कर, आणि इतर गावकऱ्यांनी सहकार्य केले.