दगडाने ठेचून वृध्येची हत्या

सुनेवर अतिप्रसंग करणाऱ्या पुतण्याला गेली होती जाब विचारायला.
चंद्रपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
पूतण्याकडून सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याने पुतण्याला जाब विचारण्यास गेलेल्या काकुला पुतण्याने दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथे घडली आहे.पुष्पा मधुकर ठेंगणे असं 62 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. तर धीरज ठेंगणे (वय 20 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. घटना 10 जुलै रोजी दुपारी 3 वा. च्या दरम्यान ची असल्याचे समजते.
सोनापूरमधील पुष्पा ठेंगणे यांची सून काल दुपारी शेतातून परत येत होती. त्यावेळी आरोपी धीरज ठेंगणे याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. गुरांच्या गोठ्याजवळ काम करत असताना ओझं उचण्याच्या बहाण्याने आरोपी धीरज ठेंगणेने पुष्पा ठेंगणे यांच्या सूनेला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार करुन तिथून पळ काढला आणि घरी येऊन सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितली. यामुळे संतापलेल्या पुष्पा ठेंगणे या पुतण्या धीरजला जाब विचारण्यासाठी गेल्या. मात्र यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यात आरोपीने काकूचा दगडाने ठेचून खून केला. इतकंच नाही तर खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घराशेजारच्या शेणाच्या खड्ड्यात टाकून आरोपी फरार झाला.
यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या मृत पुष्पा ठेंगणे यांच्या मुलाला त्यांचा मृतदेह शेणाच्या खड्ड्यात दिसला. त्याने याची माहिती पोंभुर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीवर भादंवि कलम 302, 354, 354 ब, 329, 201 आणि 501 अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे अधिकारी मनोज गदादे करत आहेत.