सूर्या आणि मयंक चा ‘ यादवी ‘ परफॉर्मन्स
भारत आणि बांगलादेश यांच्यात T20 मालिका खेळल्या जात आहे. यातील पहिल्याच सामन्यात भारताच्या सुर्यकुमार यादव आणि मयंक यादव यांनी विक्रम नोंदविला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला.या धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत १४ चेंडूत २९ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो या फॉरमॅटमध्ये किती आक्रमक फलंदाज आहे, याची झलक त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच पाहायला मिळाली होती.
त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला होता. आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने जोस बटलरला मागे सोडलं आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये २०५ षटकार मारण्याची नोंद आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर न्यूझीलंडचा स्टार फलंदाज मार्टीन गप्टील या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गप्टीलने १७३ षटकार खेचले आहेत. वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४४ षटकार खेचले आहेत. आता सुर्या ने १३९ षटकार खेचले आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज
- रोहित शर्मा- २०५
- मार्टीन गप्टील- १७३
- निकोलस पूरन- १४४
- सूर्यकुमार यादव -१३९
- जोस बटलर -१३७
आयपीएल २०२४ स्पर्धेत एक गोलंदाज तुफान चर्चेत राहिला. हा गोलंदाज लखनऊ सुपर जायंट्स संघातील युवा गोलंदाज मयांक यादव. आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीच्या बळावर त्याने शिखर धवन आणि कॅमरुन ग्रीनसारख्या फलंदाजांनाही शॉक केलं होतं.
तेव्हापासूनच त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. अखेर बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. दरम्यान पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
मयंक यादव ला भारताची स्पीड मशीन असंही म्हटलं जातं. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड नोंदवला होता. त्याने ताशी १५७.६ किमी गतीने चेंडू टाकला होता. त्यानंतर त्याला थेट टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र शेवटच्या काही सामन्यांमध्ये तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. अखेर त्याने कमबॅक केलं आणि त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
पहिलंच षटक निर्धाव
मयंक ने टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच षटकातील सर्व चेंडू ताशी १४० पेक्षाही अधिकच्या गतीने फेकले. बांगलादेशच्या फलंदाजांकडे मयांकने विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
त्याने आपल्या पहिल्याच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकलं आहे. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचे माजी गोलंदाज आणि बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांनी करुन दाखवला आहे. तर अर्शदीप सिंगने देखील इंग्लंडविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज
- अजित आगरकर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००६
- अर्शदीप सिंग विरुद्ध इंग्लंड- २०२२
- मयांक यादव विरुद्ध बांगलादेश- २०२४