विद्यार्थी रमले विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या सहवासात
गडचिरोली / तिलोत्तमा हाजरा
‘पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे’ असे म्हटले जाते. त्यामुळे निसर्गसमृद्ध अशा गडचिरोली जिल्ह्यातील बालकांना विविध रंगी आणि विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या पक्ष्यांविषयी शास्त्रीय तसेच सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने निसर्ग संरक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ग्रिन्स (ग्लोबल रिसर्च, इव्हार्यमेंट, एज्युकेशन, नेचर, सोशल वेलफेअर असोसिएशन) च्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त बुधवार (ता. ४) पक्षिनिरीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
ग्रिन्स संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त निसर्ग प्रबोधनपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून स्थानिक भगवंतराव हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे विशेष पक्षिनिरीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, गडचिरोली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, शिक्षक किशोर पाचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक लांझेडा ते खरपुंडी मार्गाच्या परीसरातील पक्ष्यांचे तसेच वनस्पती,कीटक व निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करण्यात आले. मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी परीसरातील पक्ष्यांची इंग्रजी, मराठी नावे सांगत त्या पक्ष्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे विविध प्रकारचे आवाज, घरट्यांचे प्रकार, त्यांचे खाद्य, निसर्गातील पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका अशा अनेक बाबींची सविस्तर माहिती दिली. ग्रिन्सच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे म्हणाल्या की, या विविध रंगांच्या, आवाजांच्या पक्ष्यांचे अस्तीत्व नष्ट झाले तर या जगाचा आणि पर्यायाने आपलाही विनाश अटळ आहे. अनेक पक्षी कीटकभक्षक आहेत. तसेच घुबड, कापशीसारखे पक्षी उपद्रवी उंदरांचा बंदोबस्त करून आपल्याला नेहमीच मदत करतात. त्यामुळे आपण सर्वांनी या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी व सृष्टी अधिक सुखी, सुंदर, समृद्ध करण्यासाठी पक्ष्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. शिक्षक किशोर पाचभाई म्हणाले की, पक्षी वृक्षांची फळे खातात. त्यांच्या पोटातून प्रक्रिया झालेली बिजे जमिनीवर पडताच उगवून येतात, अनेक पक्षी बिजवहनाचे आणि परागीभवनाचे काम करतात. पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व लक्षात घेता. त्यांचे जतन अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या निसर्गविषयक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत त्यांचे शंकासमाधान करण्यात आले. या शिबिरासाठी अबुझमाड शिक्षण मंडळाचे सचिव शमशेरखान पठाण, भगवंतराव हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना हकीम तसेच ग्रिन्स संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
यांची झाली ओळख…
वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित या विशेष शिबिरादरम्यान राखी वटवट्या, करण पोपट,टुईया पोपट, नकल्या खाटीक, गाणारा चंडोल, मध्यम बगळा, पाणकावळा, पाणडुबी, पिवळ्या पायांचा हरीयल, ठिपकेवाली मुनिया, लाल मुनिया, तिरंगी मुनिया, पिवळ्या डोळ्यांचा सातभाई, पांढऱ्या छातीचा खंड्या, सुगरण, कोतवाल, मैना, लालबुड्या बुलबुल, उघड चोच बलाक, घार अशा अनेक पक्ष्यांची ओळख करून देण्यात आली. तसेच शरपुंखा, अश्वगंधा, बला, कुर्डू, आघाडा आदी वनस्पतींची माहिती देत त्यांचे आरोग्यविषयक उपयोग सांगण्यात आले.
———————————-