विद्यर्थिनींवर सामुहिक बलात्कार करत तलवारीने हाताची बोटे छाटली

बांसवाडा ( राजस्थान )/ नवप्रहार डेस्क
मोहल्ल्यात हळदी च्या कार्यक्रमात आपल्या दोन लहान भावंडासह आणि वडिलांसोबत पोहचलेली तरुणी कार्यक्रम आटोपल्यावर रात्री एकटीच घरी जायला निघाली असता घरापासून 300 ते 400 फुटावर तिला दोन लोकांनी पकडून तिच्यावर बलात्कार केला. आणि तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर तलवारीने हल्ला केला. यात तिच्या हाताची दोन बोटे छाटल्या गेली.
बांसवाडा जिल्ह्यात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर गँगरेप करण्यात आला. दोन आरोपींनी आळीपाळीने या तरुणीवर बलात्कार केला. हे आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी या पीडितेवर तलवारीने वार केले. यात या पीडितेच्या हातांची बोटं कापली गेली आहेत. दोन आरोपींपैकी एका आरोपीला पीडित तरुणी ओळखत होती. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
5-6 मे च्या त्या रात्री गावात काय घडलं?
एफआयआरनुसार, 5 मे रोजी बांसवाडा जिल्ह्यातल्या केलियापाडा नावाच्या गावात रात्री गावातल्या एका घरात लग्नाची तयारी सुरू होती. हळदी समारंभ होणार होता. त्यामुळे शेजारी राहणारी मुलगी रात्री आठ वाजता तिचे दोन लहान भाऊ आणि वडिलांसह तिथं पोहोचली. लग्नघरात हळदी समारंभ संपला. त्यानंतर मुलगी रात्री दोन वाजता एकटीच तिच्या घराकडे जात होती. त्याच वेळी तिच्या घरापासून 300-400 मीटर अंतरावर एका पुलाजवळ बाइकवरून दोन तरुण तिथे गेले आणि त्यांनी त्या मुलीचा रस्ता अडवला. या दोघांपैकी एका मुलाला ही मुलगी ओळखत होती. त्या ओळखीच्या मुलाने मुलीला विचारलं, की ‘तू माझ्याशी लग्न का करत नाही.’ त्यावर मुलीने उत्तर दिलं, की ती सध्या शिकत आहे आणि त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला आहे.
आधी बलात्कार, मग तलवारीने केले वार
एफआयआरनुसार, यानंतर बाइकवरच्या दोन्ही मुलांनी मुलीला बळजबरीने पकडून नेलं आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर अत्याचार केल्यावर तिला जिवंत सोडायचा या आरोपींचा विचार नव्हता. तिच्यावर बलात्कार केल्यावर दोनपैकी एका आरोपीने तिच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण ती मुलगी कशी तरी तिथून निसटली. मग ती मुलगी पुढे पळत होती आणि दोन्ही आरोपी तिचा पाठलाग करत होते. काही अंतर पळून गेल्यावर पीडित मुलगी अंधारात एका खड्ड्यात पडली.
त्यानंतर दोन्ही आरोपी तिथं पोहोचले आणि त्यांनी तरुणीवर तलवारीने हल्ला केला. मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी डोक्यावर हात ठेवून हल्ला अडवण्याचा प्रयत्न केला. यात तिचा तळहात कापला गेला आणि दोन बोटं, तसंच उजव्या हाताचा अंगठाही कापला गेला. ती रक्ताने माखलेली होती; मात्र त्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत. यानंतर त्यांनी मुलीच्या डोक्यावर तलवारीने वार केले. यात तिच्या डोक्यालाही दुखापत झाली. ती वेदनेने विव्हळत तिथे पडून होती आणि मदतीसाठी ओरडत होती.
पोलिसांनी नोंदवला तरुणीचा जबाब
गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर रक्तबंबाळ मुलीला पाहून कोणी तरी ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर मुलीने तिच्या बाबतीत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि मग तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उदयपूरला रेफर करण्यात आलं. आता एम.बी. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली आणि कलम 164 अंतर्गत तिचा जबाब नोंदवला. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढचा तपास सुरू आहे, अशी माहिती डीएसपींनी दिली.
घटनेमागचं कारण नेमकं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालुराम असं या घटनेतल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तो बीएसटीसीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. 19 वर्षीय पीडित मुलगी बीएच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी कालुराम एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखतात. पीडितेचे कुटुंबीय त्याच्याशी तिचं लग्न लावून देण्यास नकार देत होते.
काही दिवसांपूर्वीही पीडितेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरोपी कालुराम पीडितेच्या गावी पोहोचला. तिथे जाऊन त्याने तिला भेटायला बोलावलं. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केले.
एसपींचं प्रकरणावर आहे लक्ष
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून जिल्ह्यातल्या दानपूर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 341, 307, 376 डी, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक सूर्यवीरसिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन बांसवाडाचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.