प्रेयसी ची हत्या करून परागंदा झालेल्या प्रियकाराला पश्चिम बंगाल मधून अटक

कोणगाव पोलिसांची जबरदस्त कारवाई ; वेशांतर करून आरोपीला पकडले
ठाणे / नवप्रहार मीडिया
१५ सप्टेंबर रोजी लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसी ची हत्या करून परागंदा झालेल्या खुनी प्रियकराला कोणगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून वेशांतर करत अटक केली आहे. शब्बीर दिलावर शेख असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार शब्बीर हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा असून तो विवाहित आहे.त्याला पत्नी आणि एक ८ वर्षची मुलगी आहे. अंबरनाथ एमआयडीसी मधील येथील एका कंपनीत काम करत होता. तर मृत महिला ही पतीसोबत पटत नसल्याने विभक्त राहत होती. मृत महिला आणि शब्बीर यांच्यात सुरवातीला ओळख झाली. आणि त्यानंतर दोघात प्रेमसंबंध सुरू झाले. शब्बीर महिलेसोबत कोणगाव येथील गणेशनगर परिसरात खोली घेऊन राहू लागला. मात्र, आरोपी प्रियकर हा मृतकच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घ्यायचा त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होते.
१५ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झालं. आरोपीनं या महिलेचा धारदार कटरनं गळा चिरला. तसंच दोन्ही हाताच्या नसा कापून तिला ठार मारलं. घराला बाहेरून कुलुप लावून तो पळून गेला. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खोलीतून दुर्गंध येत होता. त्यामुळं आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक दीप बने हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ते खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात गेले असता, घरातील किचनमध्ये मृत महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर कोनगाव पोलिसांसह फॉरेन्सिक पथक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठवला होता.
मृत महिलेच्या मैत्रीणीच्या तक्रारीवरून आरोपी शबीर याच्यावर १९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार कटर जप्त केलाय. त्या खोलीत मृत महिला एकटीच राहत होती. मात्र कधी-कधी तिच्यासोबत आणखी एक महिला किंवा एक पुरुषही राहात होते, अशी माहिती पोलीस पथकाला तपासात समोर आलीय. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तरदिनाजपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो त्याच्या सासुरवाडीत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
घटनेच्या दिवशी प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं तो पश्चिम बंगालमधील सासुरवाडी असलेल्या सारापूर गावातील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेला होता. हे समोर येताच एपीआय वैभव चुंबळे, विनोद कडलक यांच्यासह कोनगाव पोलीस पथकाने रुग्णालय आवारात वेषांतर करून सापळा रचला होता. उपचार करून बाहेर पडताच आरोपीवर झडप घालून त्याला ताब्यात घेतलंय. त्यानंतर पश्चिम बंगालवरून २१ सप्टेंबर रोजी कोनगाव पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक केली, अशी माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलीय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीप बने करीत आहेत