आता प्राण्यांनाही घेरले कॅन्सरने ; माकडाला झाला कॅन्सर

संभाजीनगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
कॅन्सर म्हटले की अंगावर शहारे येतात. या रोगावर वेळीच उपचार झाले नाही तर हा रोग जीवघेणा ठरतो. मनुष्याची बदलत असलेली जीवनशैली आणि आहार विहार यामागील मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. पण आश्चर्यकारक बाब म्हणजे आता प्राण्यानाही कॅन्सर ची लागण होत असल्याचे समोर आले आहे. जंगलात राहणाऱ्या आणि वृक्षांची पाने खाणाऱ्या माकडाला कॅन्सर झाला आहे.
कॅन्सर आजाराला लाखो लोक बळी पडत आहेत. दिवसागणिक देशामध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. माणसाची बदललेली जीवनशैली, आहार, सभोवतालचा पर्यावरण आणि व्यसन ही कॅन्सरला निमंत्रण देण्याची मुख्य कारणं आहेत. मात्र आता हाच जीवघेणा कॅन्सर वानरालाही झालाय असे सांगितलं तर तुम्हाला सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्यासोबत वानरालाही आपल्या जगण्याचा फटका बसलाय. जीवनशैली बदलामुळे अनेक वानरांना कर्करोग होत असल्याचे समोर आलं आहे. संभाजी नगरजिल्ह्यातील सिल्लोडमध्ये कॅन्सर झालेल्या एका वानरावर उपचार करून त्याला जंगलात पाठवण्यात आले आहे.
पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्य करणारे सिल्लोड येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. संतोष पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून पक्षी, कीटक, साप, माकड आदी जखमी आणि आजारी वन्यजीवांवर मोफत उपचार करतात. त्यांना एक वानर जखमी असल्याची माहिती मिळाली. त्या जखमी वानरावर उपचार करताना वानराला जखम नसून गुदद्वाराचा अँनो रेक्टल कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्या जखमेतून पूसदृश स्त्राव वाहत होता आणि त्यातून दुर्गंधीपण येत होती. त्यावर योग्य उपचार केल्यानंतर वानराच्या जखमेतून चार दिवसांत दुर्गंध आणि स्त्राव वाहने बंद झाले. त्यानंतर निगराणी आणि अधिक उपचारासाठी त्यास जामनेर येथे हलवण्यात आले आहे.
जैवविविधता संवर्धक आणि वन्यजीीव अभ्यासक असलेल्या डॉ. संतोष पाटील यांना आतापर्यंत दोन माकडांत कॅन्सरची लक्षणं असल्याचे आढळून आले आहे. 0.3 इतके कॅन्सरचे प्रमाण वानरांमध्ये आढळत आहे. हे प्रमाण वाढत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. काही विशिष्ट विषाणू आणि जीवन शैली बदल ही यामागची कारणं आहेत. त्यामुळे माणसाला जसं कॅन्सरने घेरलं आहे तसंच माकडांनाही भविष्यात कॅन्सर घेरू शकतो. त्यासाठी आता माणसालाच काळजी घ्यावी लागणार आहे
.