कारंजा येथे अबॅकस केंद्रीय स्पर्धेमध्ये मुलीच ठरल्या चॅम्पियन
अवघ्या पाच मिनिटात सोडवली १२५ गणिते
कारंजात केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात
कारंजा / प्रतिनिधी
मोहित गावंडे संचालित येथील एस.आय.पी. अबॅकस अकादमीच्या वतीने १० मार्च रोजी स्थानिक बाबासाहेब धाबेकर सभागृह येथे घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत तीनही लेव्हलमध्ये मुलीच चॅम्पियन ठरल्या आहेत. त्यांनी अवघ्या पाच मिनिटांमध्ये १२५ गणिते सोडविण्याची किमया साधली आहे. या यशासाठी त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एस.आय.पी. ही अबॅकसचे शिक्षण देणारी आतंरराष्ट्रीय दर्जाची संस्था असून, ती भारतात कुठेही त्यांच्या विद्यार्थांसाठी प्रोडिजी नावाने स्पर्धा आयोजित करत असते. त्याचधर्तीवर कारंजा एस.आय.पी. अबॅकस अकादमीतर्फे येथे केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून पहिल्या लेव्हलच्या स्पर्धेत आरुषी रुपेश ढोरे, दुसऱ्या लेव्हलमध्ये पियू धम्मानंद कांबळे तर तिसऱ्या लेव्हलमध्ये राजस्वी विलास वाघमारे ही चॅम्पियन ठरली. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी एसआयपीचे विदर्भ, खान्देश, मराठवाडा वरिष्ठ क्षेत्र प्रमुख राजेंद्र नन्नवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कुणाल झाल्टे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, एसआयपीचे खानदेश-मराठवाडा क्षेत्र प्रमुख सागर गुळे, खानदेश-मराठवाडा व्यवसाय विकास अधिकारी मयूर ओव्हळ, दिग्रसचे संदीप अल्हाट, पुसदचे धनंजय देशमुख उपस्थित होते. कठीण कठीण गणिते विद्यार्थी अबॅकसच्या साहाय्याने चुटकीसरशी सोडवत असल्याचे पाहून मान्यवरही आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, अंतिम टप्प्यात प्रा. सुबोध धुरंधर यांनी ‘येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कारंजा एसआयपी अकादमीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .