सामाजिक

विद्यार्थ्यांनो ! ज्ञान प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा बाळगा

Spread the love

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आदिवासी विभागामार्फत गुणवंतांच्या सत्काराचा प्रेरणादायी सोहळा

नागपूर  कला व ज्ञानावर कोणाची मक्तेदारी नाही. गुणवत्तेच्या आधारावरच जातीभेद विसरून सर्व समाज आपल्याकडे येतो. ज्ञानासोबत समृद्धी व संपन्नता येते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञान प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा बाळगावी, असे मार्गदर्शन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज विद्यार्थ्यांना केले.
आदिवासी विकास विभाग व आदिवासी विभागांतर्गत विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आज डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. गडकरी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार संदिप धुर्वे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. गडकरी यांनी नॉलेज इज पॉवर असे सांगतांनाच ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करणे हे भविष्य आहे. म्हणूनच ज्ञान मिळविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याचे सांगितले.गुणवंत विद्यार्थ्यांपासून समाजातील इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी तर ज्ञानी व गुणवंतांनी समाजाला विकासाकडे न्यावे व सर्वांना आपली गुणवत्ता दाखविण्याची योग्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आ. संदिप धुर्वे व इतर मान्यवरांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविकात यशप्राप्त विद्यार्थ्यांच्या संघर्षातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
युपीएससी -2022 परिक्षा उत्तीर्ण राहुल आत्राम, झुंड चित्रपटातून सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार विजेता अंकुश गेडाम, एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण ओसीन मडकम, आयआयटी साठी परिक्षा उत्तीर्ण रामकुमार वेट्टी, क्लॅट परिक्षेद्वारे वकीली शिक्षणासाठी पात्र झालेल्या शर्विल लटये यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, सैनिकी शाळेच्या दहावी, बारावी व जेईई पूर्व परीक्षेतील गुणवंत व यशस्वी विद्यार्थी रितेश उईके, सौरव कोरेटी, देवेंद्र भोयर, प्रशांत अलोने, सोनम सहाळा, प्रतिक्षा सलामे, कुणाल कोकोडे, दिव्या मडावी, आशिष पुराम, अर्चना कुमरे, टेकेश्वर भोयर, पुरूषोत्तम कलारी, देवेश सयाम, गिरीष नैताम, संकेत कुमडे, देवेंद्र ताराम यांचा यावेळी श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मनोज कोथळे व धनश्री परतेकी यांनी केले तर उपस्थितांचे आभार आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त श्री.कुळमेथे यांनी व्यक्त केले.
आदिवासी विभागाने अतिशय कल्पकतेने आयोजित केलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य हरिष उईके, नागपूर विभागातील प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार (देवरी) निरज मोरे (भंडारा), दीपक हेडावू (नागपूर), माजी महापौर माया इनवाते, विविध आदिवासी संघटनाचे पदाधिकारी सर्वश्री आर.डी.आत्राम, प्रा. मधुकर उईके, एम.एम.आत्राम, ॲड राजेंद्र मरसकोल्हे, दिनेश शेराम, प्रमोद खंडाते, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close