रास्त भाव दुकानदार संघटनेचा बिलोली तालुका अध्यक्ष पद निवडीला विरोध
बिलोली(प्रतिनिधि):
रास्त भाव दुकानदार संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष पदी गंगाराम पाटील हिंगणीकर यांची निवड करण्यात आली मात्र या निवडीला ९० स्व.धा. दुकानदारांनी विरोध केला आहे. आपल्या विश्वासातील काही मोजक्या दुकानदारांना बोलावुन बैठक घेवुन तालुकाध्यक्ष पदाची निवड घोषित करण्यात आली होती. या निवडी बद्दल बऱ्याच दुकानदारांना कल्पनाही दिली नाही आणि परस्पर निवड करण्यात आल्यामुळे जवळपास ९० दुकानदारांनी या निवडीला विरोध केला असुन सर्वानुमते ही निवड करण्यात यावी असा पवित्रा दुकानदारांनी घेतला आहे.
बिलोली रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची बिलोली तालुका कार्यकारिणी विशेष बैठक बुधवार दि. १७ जुलै रोजी तहसिल कार्यालय, बिलोली येथे झाली. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष बामणे यांनी स्वखुशीने आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला या बैठकीला ९८ दुकानदारांपैकी काही मोजक्या दुकानदारांच्या उपस्थितीत ठराव घेऊन गंगाराम पाटील हिंगणीकर यांची रास्तभाव धान्य दुकानदार संघटना तालुका अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली, मात्र निवडीच्या दोनच दिवसात जवळपास नव्वद दुकानदारांनी विरोध दर्शवीला असुन ही परस्पर झालेली निवड मान्य नसल्याने नुतन तालुका अध्यक्ष गंगाराम पाटील सुरोळे यांच्या निवडीला दुकानदारातुन तिव्र विरोध होत असुन तालुक्यातील ९८ स्व.धा.दुकानदारांच्या उपस्थितीत सर्वानुमते नुतन तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात यावी अशी मागणी दुकानदारांच्या वतीने करण्यात येत आहे.