29 सेकंदात 19 घाव आणि गेम खल्लास ; दिलीप सोनटक्के हत्या प्रकरण
नागपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
भिवापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दिलीप सोनटक्के यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर त्यांच्या झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 3 आरोपींनी मिळून त्यांच्यावर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसत आहे. त्यांच्यावर 29 सेकंदात 19 घाव मारण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 5 दिवसांचा पीसीआर दिला आहे.
भिवापूर येथील राष्ट्रीय मार्गावरील पेट्रोलपंपावर बुधवारी (दि. 17) सकाळी 10 वाजताच्या सुमारास मालक दिलीप सोनटक्के (60, रा. नागपूर) यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. यातील आरोपी शेख अफरोज उर्फ इमरान वल्द शेख हनिफ (33, रा. मोठा ताजबाग, नागपूर) व मोहम्मद वसीम उर्फ सोनू वल्द लाल मोहम्मद (28 रा. खरबी, नागपूर) या दोघांना उमरेड परिसरातून तर शेख जुबेर शेख कय्यूम (25, रा. मलीक शाळेजवळ, अख्तर ले-आउट, मोठा ताजबाग, नागपूर) याला नागपूर येथून अटक करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी पेट्रोलपंपाच्या आतील व बाहेरील कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार साधारणत: सकाळी 10 वाजताच्या सुमारास मृतक दिलीप सोनटक्के हे आपल्या कारने पेट्रोलपंपावर आले. ऑफिसमधील लहान स्टुलवरती दिलीप तर काऊंटरच्या आत दोन कर्मचारी बसलेले आहेत. त्यांचा हिशोब सुरू असतानाच दुचाकीवरून पेट्रोलपंपावर आलेल्या तिघांपैकी निळा शर्ट घातलेल्या एकाने ऑफिसमध्ये प्रवेश करीत, स्टुलवर बसून असलेल्या दिलीप यांच्यावर चाकूने एकामागून एक वार केले. यावेळी काऊंटरच्या आतमध्ये असलेले कर्मचारी बाहेर पळत सुटले. दिलीप खाली कोसळताच, पांढरा शर्ट घातलेल्या दुसऱ्या आरोपीने व नंतर केशरी शर्ट घातलेल्या तिसऱ्या आरोपीने दिलीप यांच्यावर सलग चाकूने वार सुरू केले. यादरम्यान पेट्रोलपंपाच्या बाहेर असलेला राजेश्वर नान्हे हा कर्मचारी आतमध्ये डोकाऊन पाहत असताना, यातील एका आरोपीने त्याच्या डोक्यावर बंदुकीच्या मागचा भाग मारत त्याला जखमी केले. केवळ 29 सेकंद चाललेला मृत्यूचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या शरीरावर तब्बल 19 घाव घातल्याचे दिसत आहे. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक विशाल आनंद, प्रभारी उपविभागीय अधिकारी संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.
अटकेतील तिन्ही आरोपींना गुरुवारी (दि. 17) दुपारी 3 वाजताच्या सुमारास कुही येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. येथे न्या. एन. जे. देशमुख यांनी आरोपींना 22 मेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या पाच दिवसांत पोलिस वेगवेगळ्या दिशेने तपास करणार असून, हत्या करण्यामागे आरोपींचा नेमका उद्देश काय? यात कोण-कोण गुंतले आहेत, या दिशेने सुद्धा तपासाची चक्र फिरणार आहेत.
–