तो तिला टीव्ही समोर बसवून गेला परत आला तेव्हा …..
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
काही घटना इतक्या लवकर घडून जातात की त्यावर विश्वास करावा अथवा नाही किंवा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे लगेच कळत नाही. पण घटना या घटनाच असतात आणि त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. अशीच एक घटना एका पुरुषाच्या आयुष्यात घडली, जेव्हा त्याची पत्नी घरातून अचानक गायब झाली.
तो कपडे सुकत घालायला काही मिनिटासाठी बाहेर गेला पण परतला तेव्हा टीव्ही पाहत बसलेली त्याची बायको गायब झाली होती. ती गेली कुठे? याचं रहस्य तब्बल 2 वर्षांनी उलगडलं.
बेल्जियममधील ही घटना आहे. पॉलेट लँड्रीक्स आणि तिचा नवरा मार्सेल टेरेट, अँडेन शहरात राहणारं हे कपल. 2 नोव्हेंबर 2020 रोजी अनपेक्षित असं घडलं. मार्सेलने कपडे धुतले आणि ते सुकत घालण्यासाठी म्हणून तो घराच्या मागील बागेत गेला. त्याने पॉलेटसाठी टीव्ही ऑन केला होता आणि तिला काहीतरी खायला दिलं होतं. आपली बायको आरामात टीव्ही पाहत आहे, असंच त्याला वाटत होता. त्यामुळे तो कपडे सुकत घालून पूर्ण झाल्यानंतर घरी आला. पण घरात परतला तेव्हा पॉलेट टीव्हीसमोर नव्हती. त्याने संपूर्ण घर शोधलं, घरातही ती नव्हती. त्याने शेजाऱ्यांना विचारले, पण त्यांनाही पॉलेटबद्दल काहीही माहीत नव्हतं.
पॉलेट सापडत नसल्याने मार्सेल घाबरला. अखेर त्याने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी हेलिकॉप्टरनं तिचा शोध घेतला. पण तरी पॉलेटचा काही पत्ता लागला नाही.
पॉलेट गायब झाली याला 2 वर्षे उलटली. 2 वर्षांपासून पॉलेटचा कोणताही मागमूस नव्हता. मार्सेलला वाटलं की तो आपल्या पत्नीला कधीही पाहू शकणार नाही किंवा तिला काय झालं हे त्याला कळणार नाही. पण 2022 साली मार्सेलच्या शेजाऱ्याने गुगलच्या स्ट्रीट व्यू सर्व्हिसच्या मदतीने असं काही पाहिलं ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. घरासमोरील रस्त्याच्या दृश्यात पॉलेट दिसत होती, जी घरातून बाहेर पडून समोरच्या फूटपाथवरून झुडुपात जात होती.
हे दृश्य पोलिसांना दाखवण्यात आलं. पॉलेट ज्या दिशेनं गेली त्याच दिशेनं पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पुढे गेल्यावर त्यांना एक दरी होती. जिथं बरीच झाडंझुडुपं होती. तिथं तपास केला असता मार्सेल सापडली पण मृत. तिचा मृतदेह सापडला. झुडुपात अडकल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, पॉलेट 83 वर्षांची होती आणि ती अल्झायमरची रुग्ण होती. या आजारात माणूस रोजच्या गोष्टी विसरायला लागतो. पॉलेटने औषध किंवा इतर गोष्टी घेतल्याचंही आठवत नव्हतं. तिचा नवरा मार्सेल तिची काळजी घेत असे. अनेकवेळा ती मार्सेलला न सांगता घरातून निघून जायची. मग मार्सेल पॉलेटच्या मागे जाऊन तिला घरी आणायचा.