अजित पवार यांना नाराजीचा फायदा ,- सुप्रिया सुळे
मुंबई / नवप्रहार मीडिया .
मंत्रिमंडळाच्या मिटिंग ला उपमुख्यमंत्री अजितदादा गैरहजर असल्याने आणि मिटिंग आटोपताच शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याने दादांच्या मनात काही तरी सुरू असल्याचा संशय राजकीय जाणकारांना आला होता. दिल्ली वारी वरून येताच पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित दादा यांची वर्णी लागली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्या कडून पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेत त्यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती च्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रायगड आणि नाशिकचा मात्र तिढा कायम आहे. दादा रुसले आणि पालकमंत्री पद मिळाले अशी चर्चा सुरु आहे. अशातच आता शिंदे गटाएवढाच आम्हालाही सत्तेत वाटा हवा, अशी अट अजित पवार यांनी ठेवली आहे, अशी माहिती समोर येतेय.
अजितदादा यांनी 28 ऑगस्टला एका पत्रकाराच्या प्रश्नावर तुझ्या तोंडात साखर पडो अशी प्रतिक्रिया दिली होती. आता सव्वा महिन्यातच दादा पुण्याचे पालकमंत्री झाले. पण, हे पालकमंत्रीपद सहजासहजी मिळालेलं नाही. दादा नाराज असल्याचा चर्चेमुळे दिल्लीत हालचाली झाल्यात. यावर पुण्याचे पालकमंत्रीपद बदलण्याबाबत आधीच ठरलं होतं असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल. तर, सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना नाराजीचा फायदा झाला, असा टोला लगावला.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासूनच, अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मंगळवारी अजित पवार कॅबिनेटच्या बैठकीला आले नाहीत. त्यानंतर लगेच शिंदे, फडणवीस दिल्लीला गेले. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची अडीच तास बैठक झाली. याच बैठकीत पालकमंत्रीपद आणि उर्वरित मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
दिल्लीतल्या बैठकीत दादांना पुण्याचं पालकमंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि पुढच्या काही तासांतच नव्या पालकमंत्रिपदाची यादी समोर आली. पुण्याचे पालकमंत्रीपद अजित दादांना मिळालं असलं तरी नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा वाद कायम आहे.
नाशिकच्या पालक मंत्रिपदासाठी अजित दादा गटाकडून छगन भुजबळ इच्छुक आहेत. तिथं शिंदे गटाचे दादा भूसे पालकमंत्री आहेत. तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दादांच्या गटाच्या मंत्री अदिती तटकरे इच्छुक आहेत. मात्र शिंदे गटाकडून भरत गोगावले मंत्रिपदासह रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत
दुसरीकडे शिंदे गटाएवढाच आम्हालाही सत्तेत वाटा हवा, अशी अट अजित पवार यांनी ठेवली आहे. शिंदेंची शिवसेना आणि आम्हाला सर्व ठिकाणी समान वाटप व्हायला हवं. महामंडळ असो किंवा खातेवाटप 25-25-50 हाच फॉर्म्युला हवा. शिंदे आणि आम्हाला 25 तर मोठा पक्ष असल्याने भाजपला 50 टक्के वाटा देण्यात यावा. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा कायम असणार. रायगडमध्ये आमचा खासदार आहे. त्यामुळे कोकणात एक तरी पालकमंत्रीपद हवं अजितदादा यांची मागणी असल्याची माहिती समोर आलीय.