प्रचार सभा व कार्यक्रमामुळे खेळाचे मैदान होत आहे खराब
पांढरकवडा / प्रतिनिधी
:- शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर परिषदेच्या कार्यालय समोरच मित्र क्रीडा मंडळाच्या मैदानावर कोणत्याही प्रकारच्या सभा व सार्वजनीक कार्यक्रमांना परवानगी देवु नये.अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन खेळाडु व क्रीडाप्रेमीकडुन करण्यात आली असून परंतु तरी सुध्दा नगर परिषदेच्या वतीने राजकीय पक्षाच्या सभा तथा सार्वजनीक कार्यक्रमांना परवानगी देण्यातच येत असल्याने खेळाडुंच्या सरावात खंड पडत असुन दुसरीकडे मैदान सुध्दा खराब होत आहे.गेल्या ५० वर्षापेक्षा जास्त कालवधीपासुन स्थानिक मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने मैदानावर खो-खो,कबड्डी,कुस्ती,लाठी-काठी आदि खेळांचा सराव सुरु आहे.या मंडळाने आज पर्यत शेकडो राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडु तयार केले व करीत आहे.या मंडळाच्या मैदानावर दैनंदिन शेकडो महिला-पुरुष,मुले-मुली खेळाचा सराव करीत असतात.शहरातील हे एक असे मंडळ आहे.जिथे बाराही महिने खेळाचा सराव व क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात येत असतात.हे मैदान फक्त खेळांकरीताच वापरण्यात यावे,अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन खेळाडु व क्रीडाप्रेमीतुन करण्यात येत आहे.परंतु नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षास प्रचार सभा,आंदोलने तथा सार्वजनीक कार्यक्रमांना सुध्दा परवानगी देण्यातच येत आहे.शहरात ईतर ठिकाणी मोठ मोठे सभागृह तथा मैदान असतांना सुध्दा नगर परिषद च्या वतीने जिथे बाराही महिने खेळाचा सराव सुरुच असतो.अशा जागेवर वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत असल्याने खेळाडु व क्रीडाप्रेमीतुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.कार्यक्रमासाठी मैदानावर मोठ-मोठे खड्डे करुन मंडप उभारण्यात येत असतात.शिवाय जेवणाच्या पत्रावळी,उरलेले अन्न,पाणी पॉउच आदिंचा कचरा कार्यक्रमानंतर मैदानावर जमा होवुन राहतो.कार्यक्रम होवुन कित्येक दिवस नगर परिषद च्या वतीने तो कचरा साफ करण्यात येत नसल्याने अनेकदा खेळाडुंना मैदानाची साफसफाई करावी लागते.मागिल आठवड्यात याच मैदानावर झालेल्या सभेचा कचरा अद्यापही नगर परिषद च्या वतीने साफ करण्यात आला नाही.मैदानावर पाणी पॉउच तथा जेवणावळीच्या पत्रावळी व शिळे अन्न पडुन आहे.त्यामुळे मैदान परिसरात दुर्गंधी सुध्दा पसरली आहे.