शिर्डी येथील हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे सोने आणि रोकड चोरीला …
गुन्हा दाखल
शिर्डी..राजेंद्र दूनबळे.
सबका मालिक एक व श्रद्धा व सबुरी शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत. एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे सोने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना घडल्या मुळे एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात यांनी त्यांचा चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहीत रा. चौहटन, राजस्थान याच्यावर संशय व्यक्त केला आहे.
खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार हे देखील होते. ते हॉटेल साई सुनीताच्या रूम नंबर २०१ मध्ये मुक्कामी होते. खिशी हे जिल्ह्यातील विविध सोनार दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते आणि रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत होते. १३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण करून ते रूममध्ये झोपले. त्यांच्याजवळ सोन्याच्या दागिन्यांची बॅग टेबलच्या मध्ये ठेवलेली होती आणि रूम आतून लॉक होता
बुधवार दि.१४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता. आत पाहिले असता चालक सुरेश कुमार रूममध्ये नव्हता. त्याचा मोबाईल फोन आणि कपडे रूममध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर खिशी यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग तपासली असता, त्यातील सुमारे ३.५ किलो वजनाचे ३ कोटी २२ लाख रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले.
खिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार हा त्यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामाला होता आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र, त्याने त्यांचा विश्वासघात करून चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने, यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, तुषार धाकराव, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव हे अधिक तपास करत आहेत शिर्डीतील
गुन्हेगारी संपवण्याच्या मार्गावर पोलिस प्रशासन असतानाच या चोरीच्या घटनेने पुन्ह एकदा गुन्हेगाराणी पोलिसांना आवाहन दिल्याचे नागरिकांमध्ये या विषयी जोरदार चर्चा आहे..