त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
मुंबई / नवप्रहार प्रतिनिधी
राजकारणात कोणी कोणाचा शत्रु आणि मित्र नसतो. त्यामुळेच राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. काल दि. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांनी, केंद्रीयमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यात निवडणुकी तुतारी फुंकणाऱ्या नेत्याचा समावेश आहे. त्यांनी काल सहकुटुंब फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.
प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला. तेथेही मुख्य सचिवांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. त्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेते, भाजप पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांचं अभिनंदन करत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला जय श्रीराम करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणाऱ्या हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil) यांनी सहकुटुंब नव्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला आहे. त्यामुळे, या ताबडतोब भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर हर्षवर्धन पाटील कुटूंबीयांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अंकिता पाटील यांनी पुष्पगुच्छ देत देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, राजवर्धन पाटील उपस्थित होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना भाजपमधून तिकीट मिळत नव्हते, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या निवडणूकित हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळेच, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार उपस्थित होता, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यानंच सागर बंगला गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शरद पवारांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, महाविकास आघाडीतील नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे नेते देखील शपथविधीला हजर राहणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर, हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.