सारडा महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
अंजनगाव सुर्जी 🙁 मनोहर मुरकुटे )
स्थानिक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने दिनांक १२ जून २०२३ ते २१ जून २०२३ या कालावधीत मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे.
सन २०१५ पासून विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग इतिहास विभागाद्वारे विभागातील प्राध्यापक डॉ नितीन सराफ हे दरवर्षी महाविद्यालयात आयोजित करीत असतात, त्याचीच पुढील पायरी म्हणून ह्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केलेले आहे. ह्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्याकरिता शिक्षणाची अट नाही, परंतु प्रशिक्षण घेणाऱ्यास मराठी भाषा अवगत असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सुमारे १२ व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत राज्यकारभारात आणि व्यवहारात मोडी लिपीचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्तऐवज आजही मोडीलिपी मध्ये उपलब्ध आहे. परंतु सद्यस्थितीत मोडी लिपी वाचकांची संख्या नगण्य असल्यामुळे या कालबाह्य होत असलेल्या लिपीला काही अंशी पुनर्जीवित करून त्याचा इतिहासाच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतिहास प्रेमींना व हौशी अभ्यासकांना उपयोग व्हावा यासाठी पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडून मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्वांसाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रशिक्षण वर्गात शासकीय कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी, इतिहास प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बशिष्ठ चौबे व या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक डॉ नितीन सराफ, प्राध्यापक, इतिहास विभाग यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे.