सारडा महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न
“शिक्षण हे देव, देश आणि धर्मासाठी असायला हवे…”*
प.पू. श्री जितेंद्रनाथ महाराज*
अंजनगाव सुजी मनोहर मुरकुटे
” वर्तमान शिक्षणाचे ध्येय हे फक्त भौतिक सुखाच्या मागे धावणारे असून त्यात देव देश आणि धर्म याच्या हिताची जाणीव नाही असे बहुमोल प्रतिपादन सुर्जी अंजनगाव येथील देवनाथ पीठाधीश्वर परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. ते श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात आयोजित संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती च्या पाचव्या पदवी वितरण सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून त्यांच्या आशीर्वचनात विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते.या प्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील 300 विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आली. प.पू.गुरुजी त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की आई-वडील हे विद्यार्थ्यांचे चालते बोलते विद्यापीठ असून सध्याची शिक्षण व्यवस्था ही जीवनातील नीती मूल्य शिकवणारी नाही तर फक्त जगातील सर्वसामान्य माहिती देणारी आहे.त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्थेने देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पुढील शंभर वर्षांचा कृती आराखडा बनवायला हवा.
या प्रसंगी सारडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री अभयजी सारडा व सचिव डॉ अमरजी सारडा त्याचप्रमाणे इतर सदस्य डॉ मधुसूदनजी सारडा, जगदीशजी सारडा व संजयजी सारडा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वशिष्ठ चौबे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन इंग्रजी विभागातील डॉ बीना राठी यांनी त्यांच्या आकर्षक शैलीत केले. कार्यक्रमाची सुरुवात ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गीताने करण्यात आली तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ नितीन सराफ, कार्यक्रम समन्वयक, डॉ मंगेश डगवाल, IQAC समन्वयक व विज्ञान शाखाप्रमुख, डॉ सत्येंद्र गडपायले, कला शाखाप्रमुख, डॉ ताई उके, वाणिज्य शाखाप्रमुख व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठीण परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांकरिता युट्युब वर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांच्या आगमनाने , त्यांच्या वास्तव्याने व त्यांच्या ओजस्वी वाणीने संपूर्ण महाविद्यालयीन परिसर भारावून गेले होते.