आरजी कार मेडिकल कॉलेज च्या माजी प्राचार्य संदीप घोष यांना CBI कडून अटक
कोलकाता / नवप्रहार डेस्क
भारततेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या कोलकाता ट्रेनी मेडिकल कॉलेज चे माजी प्राचार्य संदीप घोष यांना सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांच्या तक्रारी नंतर सीबीआय ने आर्थिक घोटाळ्या प्रकरणी घोष यांना अटक केली आहे.
माहितीनुसार, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून चौकशी सुरु होती. रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेप्रकरणी त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु होती. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयकडून रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात बेवारस मृतदेहांची तस्करी, जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि बांधकाम निविदांमध्ये घराणेशाही करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे याच रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी 25 व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. संपावर असलेल्या डॉक्टरांनी पोलीस आयुक्त विनीत गोयल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी समोवारी लालबाजार येथील कोलकाता पोलीस मुख्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्युनियर सरकारी डॉक्टरांनी ओपीडीमधील काम अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आरजी कार हॉस्पिटलमध्ये 14 ऑगस्ट रोजी झालेली तोडफोड रोखण्यात डॉ. गोयल अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकारी करत आहे. तसेच या गुन्ह्यातील संशयितांपैकी एक असलेल्या आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना निलंबित करण्याचीही मागणी ते करत आहे.
सध्या संपूर्ण देशात कोलकाता रेप प्रकरणावरून संतापाची लाट पसरली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून सोमवारी संदीप घोष यांची चौकशी करून सोमवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.