सना खान चा मारेकरी अमित शाहूला पोलिसांनी केले जेरबंद

खून करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली
नागपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
भाजपा पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात मानकापूर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला जबलपूर येथून अटक केली आहे. अमित याचा नोकर जितेंद्र गौड याने सना हिचा खून करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली आहे.
सना खान या त्यांच्या व्यापारी भागीदार अमित उर्फ पप्पू शाहू याला भेटण्यासाठी जबालपूरला गेल्या होत्या. तिथे पोहचल्यावर त्यांनी त्यांच्या आईला जबलपूरला पोहचल्याची माहिती दिली. सना खान आणि अमित साहू यांच्यामध्ये चांगले संबंध असल्यामुळे त्याच्या घरी थांबल्या होत्या. मात्र दुसऱ्या सना खान यांच्या आईने त्यांना फोन लावल्यावर फोन बंद लागला आणि त्या दिवसांपासून सना खान बेपत्ता झाली होती. त्यामुळे त्यांच्या आईने मनकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
सना खान यांच्या आईने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर मनकापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पथक जबलपूरला रवाना झाले होते. अमित शाहू ढाब्याला कुलुप लावून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करताना अमित साहूचा नोकर जीतेंद्र गौडा याला अटक केली होती. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली.
आरोपी अमित साहू जबलपूरमध्येच लपून बसल्याची पोलिसांना टीप मिळाली. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची मदत घेऊन पोलिसांनी अमित साहूला सापळा रचून जबलपूरमध्येच अटक केली. साहूने चौकशीदरम्यान सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अमित साहू मागील 10 दिवसांपासून जबलपूरमध्ये लपून बसला होता. मानकापूर पोलिसांचे पथक साहूला घेऊन नागपूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान सना खान बेपत्ता होऊन 9 दिवस उलटून गेले तरी आतापर्यंत मध्य प्रदेश पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस तिला शोधू शकले नव्हते, त्यामुळे नागपूर भाजपाकडून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले होते. अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस जुनैद खान यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हे प्रकरण आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले होते.