साखर कारखान्याला आग , पाच कोटींचे नुकसान

जिवित हानी नाही ; शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा संशय
१० अग्निशमन यंत्रांनी मिळविले आगीवर नियंत्रण
कोल्हापूर / नवप्रहार ब्युरो
इंजिन रूम मध्ये ड्रेन क्लिनिंग चे काम सुरू असताना झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे ऑइल ने पेट घेतल्याने राजाराम कारखान्यात आगीची घटना घडली. आगीचे लोट ७० फुटापर्यंत वर उठले होते. चहापान ब्रेक असल्याने सर्व कामगार चहा घेण्यासाठी कॅन्टीन मध्ये असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मोठ्या दबावामुळे ऑईल साठवलेल्या टर्बाईनच्या स्फोट झाला.वंगणामुळे आगीचा भडका उडाला. आग पसरत गेल्याने वायरिंग, गॅसकिट जळाले. त्यात पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
महापालिकेसह अन्य ठिकाणच्या दहांहून अधिक अग्निशमन दलाच्या पथकांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. कारखान्याचा हंगाम चार दिवसांपूर्वीच संपला आहे. सध्या अंतर्गत देखभालीची कामे सुरू आहेत.
कारखान्यातील इंजिन रूममध्ये ड्रेन क्लिनिंगचे काम सुरू होते. यावेळी तेथील मशीन शॉर्ट झाल्याने ऊस गाळप इंजिनच्या तळातील ऑईलमध्ये ठिणग्या पडल्या आणि आग लागली. इंजिनमध्ये अडकलेल बगॅस, ऑईल पेटल्याने आग पसरत गेली. आग पाहताच कामगारांची धावपळ उडाली.
आग वेगाने पसरून स्फोट…
ऑईलने पेट घेतल्याने आग आतील भागात पसरत गेली. आगीचे व धुराचे लोळ छतापर्यंत उठले होते. मोठ्या दबावामुळे ऑईल साठवलेल्या टर्बाईनच्या स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने बाहेर असलेल्या कामगारांसह परिसरातील रहिवाशांनीही घटनास्थळी धाव घेतली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी येथील आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले; पण आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
दहाहून अधिक अग्निशमन पथके
महापालिकेकडील सासने मैदान, प्रतिभानगर, फुलेवाडी, टिंबर मार्केट स्थानकांचे बंब अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या सहा बंबांसह तीन खासगी बंब घटनास्थळी पोहोचले होते. याशिवाय जवाहर कारखाना, मंडलिक कारखाना, वारणा साखर कारखाना, वडगाव नगर परिषद, जयसिंगपूर नगर परिषदेचे बंबही राजाराम कारखान्यात दाखल झाले. दीड तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळाले; मात्र दुपारपर्यंत ऑईल रुममधून धुराचे लोट बाहेर पडत होते. यामुळे पुन्हा फोम व पाणी मारण्यात येत होते.
अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह स्थानक अधिकारी जयवंत खोत, ओंकार खेडकर, अभी सरनाईक, मोहसीन पठाण, विजय सुतार, आकाश जाधव, दत्तात्रय जाधव, पुंडलिक माने, मेहबूब जमादार, उमेश जगताप, सौरभ पाटील, अनिकेत परब आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, उपाध्यक्ष गोविंद चौगले, संचालक दिलीप पाटील, शिवाजी पाटील, प्रदीप उलपे, डॉ. एम. डी. किडगावकर, डॉ. विश्वास बिडकर, तानाजी पाटील, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी घटनास्थळी थांबून होते.
आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात चार ते पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या जवानांसह आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीने आगीवर नियंत्रण मिळविले. हंगाम संपल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
– अमल महाडिक, कारखान्याचे अध्यक्ष
सत्तर फुटांपर्यंत आगीचे लोळ…
कारखान्यात ऊस वाहतुकीचे वाहन आल्यानंतर तो ऊस उचलून इंजिन रूमच्या ट्रॅकवरून पुढे जातो. त्याच ठिकाणी शुक्रवारी आग लागली. हंगाम संपल्याने येथील ट्रॅकची स्वच्छता केली जात होती. ट्रॅकच्या तळमजल्यात ऑईल होते तर बाजूने शिड्यांवरून कामगारांना वरच्या मजल्यावर जावे लागते. याच्याच पहिल्या टप्प्यावर शॉर्टसर्किट होऊन आग लागली. येथे लागलेल्या आगीचे लोळ अंदाजे सत्तर फूट उंचीपर्यंत जात होते. शुक्रवारी येथे ३० ते ४० कर्मचारी आग लागण्याच्या काही वेळ अगोदरपर्यंत तीनही टप्प्यावर काम करत होते. चहासाठी सर्वजण बाहेर गेल्याने मोठा अनर्थ टळला.
चहाची सुटी अन् जीवितहानी टळली…
सकाळी दहाच्या सुमारास कर्मचाऱ्यांची चहाची सुटी झाल्याने आत काम करणारे सर्व कामगार बाहेरील कॅन्टीनमध्ये आले होते. आतमध्ये वेल्डिंग काम करणारे मजूर होते. तेही बचावले. याच दरम्यान आगीने रौद्ररूप धारण करून स्फोट झाला. येथे ठेवलेले बगॅसही पेटल्याने आग पसरली.