सद्गुरु सद्शिष्यांच्या सदिच्छा पूर्ण करतात.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ*
बाळासाहेब नेरकर कडुन
भगवान परमात्मा संकल्प मात्राने सृष्टी निर्माण करतो . परंतु उद्धार मात्र स्वभक्तांचाच करीतो सर्वांचा नाही . किंबहुना त्याला सुद्धा सर्वांचा उद्धार करण्यासाठी सद्गुरु रूपाने परिणत व्हावे लागते . आपले सगे सोयरे तर नाहीच नाही , परंतु इंद्रादिक देव सुद्धा हे कार्य करण्यास असमर्थ ठरतात. सद्गुरुच जीवाला भवसागरातून तारूनही नेतात व सद्शिष्यांच्या सर्वच सदिच्छा सदैव पूर्ण करतात . असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज वडाळी सटवाई स्थित श्री वैष्णव ज्ञान मंदिर येथे संत श्री वासुदेवजी महाराज मूर्तीप्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाची औचित्य साधून आयोजित असलेल्या भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहातील किर्तन प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा भक्तांची वाट पाहणारा देव , उघडे परब्रम्ह असणारे सद्गुरु आणि राम कृष्ण हरी नामक मंत्र हे तिन्ही उघडे आहेत. अर्थातच त्यामध्ये कुठलीही बदमाशी नसल्यामुळे झाकाझाकीचे काम नाही. मानवी जीवनामध्ये योग्य सद्गुरु प्राप्त होणे हे सद्शिष्याचे सद्भाग्य असून , त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगणे हे महद्भाग्य तर , त्याद्वारे आत्मोद्धारा प्रत पोहोचणे हे अहोभाग्याचे लक्षण आहे. उपजताची ज्ञानी असणारे भगवान श्री ज्ञानोबाराय स्वतःला गुरुचा दास म्हणून घेत आत्मोद्धाराकरिता त्या व्यतिरिक्त कुठलीही साधन न करिता मी हा भवसागर धरून गेलो आहे असे ठामपणे सांगतात. तद्वत तब्बल ३७ गद्य व पदयात्मक ग्रंथाचे आपल्या सिद्धस्थ लेखणीने लेखन व प्रकाश करून लोककल्याणार्थ विनामूल्य वितरित करणारे अलौकिक प्रज्ञेचे धनी संत श्री वासुदेवजी महाराज सुद्धा स्वतःला ज्ञानेश्वरदासच म्हणून घेत होते. आज मात्र दोन अभंगांवर चिंतन बसविणारे स्वतःला स्वामी म्हणून घेतात याचे सखेद आश्चर्य वाटते असे सुद्धा महाराज यावेळी म्हणाले. तसेच बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या श्रोतृमंडळींना श्रींचे कुलोत्पन्न व त्यांचे आळंदी पंढरपूरची पायी वारी तसेच बालसंस्कार शिबिरादि कार्य नेटाने व निष्ठेने पुढे नेणारे श्रीयुत अशोकजी महाराज जायले यांच्या कार्याला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.