लाखनी पोलीस स्टेशन तर्फे शहरात रूट मार्च
पोलीस विभागाचे शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन
लाखनी:- सध्या सुरू असलेले गणेश उत्सव पर्व व आगामी ईद-ए-मिलाद उत्सवा दरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गुरूवारी (ता.१२) रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गांवरून पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सिडाम साकोली यांच्या नेतृत्वात लाखनी पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूटमार्चची लाखनी पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली.पोलीस मुख्यालय भंडारा येथून आलेले आरसीपी पथक क्रमांक १ व २ चे ४ अधिकारी व ७५ अंमलदार यांचे सह पोलीस स्टेशन लाखनी पासून ते सुन्नी हंफी बरेल्वी मज्जिद लाखनी ते गुजरी चौक ते विसर्जन होणारे ठिकाण शिवमंदिर तलाव वॉर्ड लाखनी येथून लाखोरी रोडकडे परत येऊन लाखनी शहराकडे केसलवाडा/फाटा चौक ते मुरमाडी मार्गे ग्रामपंचायत मुरमाडी,सावरी गावातून सोमलवाडा रोड ते नगरपंचायत समोरील गणपती समोर विश्रांती घेऊन पुन्हा सिंधी लाईन चौक ते बसस्टॉप चौक वरून पो.स्टे.ला ८ वाजेपर्यत रूट मार्च करून परत लाखनी पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला.
या रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पथक,एसआरपी पथक,होमगार्ड पथक,लाखनी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव,साहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.आयोजित रूट मार्च दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डी.जे.चा वापर करू नये, गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान लेझर लाईटचा वापर करू नये,गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक दरम्यान इतर धर्मियांचे धार्मिक भावना दुखावणार नाही असे गाणे वाजवू नये व इतर धर्मियांचे धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करू नये., सोशल मीडियावर प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट इतरत्र प्रसारित करू नये आदी सूचना देण्यात आल्या.