सामाजिक

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीने आयोजित केली 1000 गरजू विद्यार्थिनींच्या मोफत HPV लसीकरण मोहीम.

Spread the love

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून 

अहिल्यानगर / प्रतिनिधी

अहिल्यानगर: आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीने 1000 गरजू विद्यार्थिनींना मोफत HPV (ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस) लसीकरण करून त्यांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम आयोजित केली. रोटरी प्रियदर्शिनीच्या सर्व सदस्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून अनेक शाळा, झोपडपट्टी, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांत जाऊन विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबत चर्चासत्रांचे व सदर कर्करोगाबाबत जनजागृतीचे आयोजन केले. या जागृती पर मार्गदर्शन सत्र व चर्चांमध्ये प्रमुख स्त्रीरोग तज्ञ आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबद्दल मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात आली.

या लसीकरण मोहिमेत स्थानिक स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ आणि विविध डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. HPV लसीकरणामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम टाळता येतात आणि या लसीकरणासाठी आता स्वदेशी लस उपलब्ध असल्याने ही मोहीम अधिक प्रभावी ठरली आहे. या समाजोपयोगी उपक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीने मुंबई येथील 1969 साली स्थापन झालेल्या कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आणि अहमदनगर येथील SK AVAM चॅरिटेबल फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला.

रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा सौ. मिनल ईश्वर बोरा यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “आमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष पद स्वीकारतांनाच या उपक्रमाची मी घोषणा केली होती व त्यामाध्यमातून आपल्या सर्व गोडुलींना सदर कर्करोगापासून सुरक्षित करण्याचा माझा व क्लब चा मानस होता. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा संसर्गजन्य रोग असून, तो संपवण्याचा 2030 पर्यंतचा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे. आम्ही हे कार्य माता-पित्यांसोबत समन्वय साधून करत आहोत, कारण त्यांच्यासाठी त्यांच्या मुलींचे आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे.”

या लसीकरण मोहिमेत ज्या विद्यार्थिनींचे वय 9 ते 18 वर्षे आहे, त्यांना मोफत लस देण्यात आली. तसेच, पालकांची माहिती देणारी संमती घेऊन आणि शाळांच्या माध्यमातून विद्यार्थिनींची पूर्वनोंदणी करण्यात आली होती. या उपक्रमाचे आयोजन सारडा कॉलेजमध्ये करण्यात आले. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी या उपक्रमाचे कौतुक केले.

शिबिराची सुरुवात ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे ट्रस्टी व SK AVAM चॅरिटेबल फाऊंडेशन चे अशोक (बाबूशेठ) बोरा यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली, ज्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना लसीकरण करण्यात आले. रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा मिनल ईश्वर बोरा, सचिव स्वाती गुंदेचा, आकांक्षा पुनर्वसनच्या सविता काळे, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या डॉ. नुपूर खरे आणि प्रिया प्रसाद, डॉ विजय पितळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, सारडा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, भाई सत्था नाइट स्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, मोहन मानधना, माणिकराव विधाते, छायाताई फिरोदिया, प्रतिभाताई धूत, आशाताई फिरोदिया, रिटा झवर, कुंदा हल्बे, अनुराधा आठरे, लता भगत, रंजना भंडारी, सारडा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका माहेश्वरी गावीत आणि रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष ईश्वर बोरा, महेश गुंदेचा, कुणाल भंडारी, सुमित वर्मा, भैय्या भांडेकर, चिंटू खंडेलवाल, रोटरी सेंट्रल चे अध्यक्ष कुणाल कोल्हे, इंटेग्रिटी चे निखिल कुलकर्णी, मयुर राहिंज आदी मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

या समाजोपयोगी उपक्रमासाठी पालकांनी मोठ्या संख्येने सहकार्य केले आणि आपल्या मुलींना लसीकरणासाठी शिबिरस्थळी स्वतःहून घेऊन आले. यावेळी लाभार्थी बालिका व त्यांच्या पालकांकरीता SK AVAM तर्फे अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, SK AVAM चॅरिटेबल फाउंडेशन आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close