मुंबईसह राज्यातील बारावी परीक्षा सुरळीतपणे सुरु
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा आजपासून राज्यात सुरू होत आहेत. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे अनेक उपाय योजना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रश्नपत्रिका लिफाफे ताब्यात घेतल्यापासून ते प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंत चित्रकरण करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाकडे देण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांच्या वाहतुकीच्या वेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे,मुंबईसह राज्यातील बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील अशी माहिती मुंबई विभागाचे अध्यक्ष सुभाष बोरसे यांनी आमच्या प्रतिनिधी दिली.
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होत आहे. यंदा विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली आहे.
परीक्षा मंडळाने दिलेल्या सुचनांनुसार परीक्षा केंद्रावर योग्य ती तयारी केली असल्याची माहिती मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी दिली. परीक्षा केंद्रावर उपस्थीत असलेल्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी शुभेच्छाही मुख्याध्यापकांनी दिल्या.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थी किमान अर्धा तास लवकर येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. बोर्डाच्या परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल तसेच फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाँल तिकीट रोखता येणार नाही अशा सुचना परीक्षा मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या परीणामकारक अंमलबजावणीसाठी परीक्षा मुल्यमापन दोनवेळा होणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली.